आग्रा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प हे आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. अहमदाबादेतील मोटेरा मैदानावर ट्रंम्प यांच्या स्वागतासाठी जमलेल्या उपस्थितांना संबोधित करत ट्रंम्प यांनी आपल्या भारत दौऱ्याची दिमाखात सुरुवात केली. यानंतर त्यांनी शहरातील ऐतिहासिक साबरमती आश्रमाला पत्नी मेलेनिया यांच्यासह भेट देत काही वेळासाठी चरखा चालवला.
साबरमतीहून ट्रंम्प यांनी आग्र्याकडे कूच करत येथील जगप्रसिद्ध वास्तू ताजमहालास भेट दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प व अमेरिकेच्या प्रथम महिला मेलेनिया ट्रंम्प या जोडप्याने यावेळी प्रेमाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताजमहालाचे सौंदर्य अनुभवले. ताजमहाल या ऐतिहासिक वास्तूस भेट देणारे ट्रंम्प अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष ठरले.
ताजमहालास भेट दिल्यानंतर ट्रंम्प यांनी ताजमहालाबाबत आपला अभिप्राय देखील नोंदवला. आपल्या अभिप्रायामध्ये ते लिहतात, “ताजमहाल भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सौंदर्याचे शाश्वत प्रतीक आहे. ताजमहालाचे सौंदर्य आश्चर्यचकित करणारे आहे. भारताचे धन्यवाद!”