अहमदाबाद – भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे त्यांचे स्वागत करीत आश्रमाची त्यांना माहिती दिली. तसेच आश्रमातील गांधीजी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांची हदय कुंज ही खोलीही त्यांनी ट्रम्प यांना दाखवली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या जागेचे काय महात्म्य आहे याचीही कल्पना मोदींनी ट्रम्प यांना दिली.
यावेळी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया यांनी चरख्यावर सूत विणण्याचाही अनुभव घेतला. येथून पुढील कार्यक्रमाला रवाना होण्यापुर्वी ट्रम्प यांनी अभ्यागतांच्या नोंद वहित आपला शेरा लिहीला आहे. त्यात त्यांनी या महत्वाच्या भेटीबद्दल मोदींचे आभार मानले आहेत. मात्र त्यांच्या या संदेशात महात्मा गांधी यांचा उल्लेख मात्र नाही. ट्रम्प हे या आश्रमात सुमारे पंधरा मिनीटे होते. यावेळी या भेटीची आठवण म्हणून मोदींनी त्यांना महात्मा गांधींच्या तीन माकडांची वैशिष्ट्यपुर्ण प्रतिकृती त्यांना भेट दिली.