वॉशिंग्टन – अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटल हिलमध्ये 6 जानेवारीला झालेल्या धुडगुस प्रकरणी तपास करणाऱ्या पॅनेलने या संदर्भात माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट ठपका ठेवला आहे. ट्रम्प यांनी 2020 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांचे निकाल उधळून लावण्यासाठी हा धुडगूस नियोजनबद्धपणे घडवून आणला होता, असे या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केलेल्या पॅनेलचे सह प्रमुख लिझ चेनी यांनी म्हटले आहे. या संदर्भात झालेल्या पहिल्या उघड सुनावणीच्यावेळी त्यांनी हे निरीक्षण नोंदवले. या पॅनेलची पहिली सार्वजनिक सुनावणी आज झाली.
अनेक महिन्यांपासून ट्रम्प अशाप्रकारच्या हल्ल्याची तयारी करत होते. त्यांनीच या हल्ल्याचे पूर्ण नियोजन केले होते. या हल्ल्यासाठी सात भागांचे नियोजन करण्यात आले होते. अध्यक्षीय निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर सत्तेचे हस्तांतरण उधळून लावण्यासाठी त्यांनी हे बंड जाणीवपूर्वक घडवून आणले होते. यातील प्रत्येक भागाचे सविस्तर पुरावे सादर केले जाऊ शकतात, असे चेनी यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
निवडणूकीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा खोटा दावा अमेरिकेच्या न्याय विभागाला सहज पसरवता यावा म्हणून ट्रम्प यांनी तत्कालिन ऍटर्नी जनरल बिल बार यांनाही हटवण्याची योजना आखली होती, असेही चेनी यांनी म्हटले आहे.
वर्षभर चाललेल्या या तपासासाठी नियुक्त असलेल्या पॅनेलमधील दोन सदस्यांनी प्रथम आपली मते मांडली. या संदर्भात आतापर्यंत पुढे न आलेल्या काही पुराव्यांबाबतही उघड चर्चा झाली. या पॅनेलमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे 7 आणि रिपब्लिकन पक्षाचे 2 सदस्य आहेत. या पॅनेलने दोन साक्षीदारांनाही पाचारण केले. त्यामध्ये प्रत्यक्ष घटनेच्यावेळी जखमी झालेल्या पोलिसाचा समावेश आहे.
6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प यांच्या समर्थकानी कॅपिटल हिलवर एकत्रितपणे हल्ला केला होता. अध्यक्षीय निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून संसदेचे सत्र बंद पाडले गेले होते. यावेळी 140 पोलीस जखमी झाले होते.