वॉशिंग्टन – श्रीलंकेतील आत्मघातकी बॉम्बस्फोटांचा निषेध करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमध्ये एक मोठी गफलत झाली. यामुळे ट्रम्प यांचे काही काळ हसे झाले.
“श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावलेल्या नागरिकांबद्दल अमेरिकेच्या नागरिकांच्यावतीने आपल्या सहवेदना आहेत. या प्रसंगी श्रीलंकेला सर्व मदत करायला आपण तयार आहोत.’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र या ट्विटमध्ये मरण पावलेल्या नागरिकांचा आकडा लिहीताना 138 दशलक्ष असे त्यांनी चुकीने नमूद केले. थोड्याच वेळा ही चूक ट्रम्प प्रशासनाच्या लक्षात आल्यावर हे ट्विट मागे घेण्यात आले आणि ही चूक दुरुस्त करण्यात आली. मात्र तोपर्यंत ट्रम्प यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून जगभरातील नेत्यांपर्यंत ही गफलत पोहोचली होती.