वॉशिंग्टन: अमेरिकेतील कंपन्यांनी रोजगारासाठी स्थानिकांची निवड करावी अशा आशयाच्या आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्वाक्षरी केली. विदेशी कर्मचाऱ्यांना आणि प्रामुख्याने “एच1-बी’ व्हिसा धारकांना नोकऱ्यांसाठी नियुक्त करण्यास या या आदेशामुळे मनाई करण्यात आली आहे.
सुमारे महिन्याभरापूर्वी 23 जून रोजी ट्रम्प यांनी “एच1- बी’व्हिसा स्थगितीचे आदेश दिले होते. याशिवाय विदेशी नागरिकांना अमेरिकेमध्ये काम करण्याची परवानगी देणाऱ्या अन्य प्रकारच्या व्हिसांनाही ट्रम्प यांनी 2020 च्या अखेरपर्यंत स्थगित केले होते. अमेरिकेमध्ये यावर्षी नोव्हेंबरमध्ये
अध्यक्षीय निवडणूका होत आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारामध्ये प्राधान्य दिले जाण्याच्या हेतूने ट्रम्प यांनी हा आदेश दिला आहे.
“एच1-बी’ व्हिसा अंतर्गत भारतातील “आयटी’तज्ञांची अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर नियुक्ती होत असते. प्रामुख्याने तांत्रिक कौशल्य असलेल्या भारतीय युवकांना अमेरिकेतील चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांसाठी “एच 1 बी’ व्हिसाच्या माध्यमातून तेथे जाणे शक्य होत असते.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्या भारत आणि चीनसारख्या देशांमधील कुशल मनुष्यबळाला नियुक्त करण्यासाठी “एच 1-बी’वर अवलंबून असतात. मात्र आता 2020 च्या अखेरपर्यंत या कंपन्यांना केवळ अमेरिकेतील उमेदवारांनाच नियुक्त करणे शक्य होणार आहे.
कष्टाळू अमेरिकनांना टाळून स्वस्तातल्या विदेशी कामगारांना प्राधान्य देणे आपण सहन करू शकत नाही. त्यासाठी “एच 1-बी’च्या नियमात बदल आवश्यक आहे, असे ट्रम्प म्हणाले. केवळ अमेरिकनांना दिल्या जाऊ शकणाऱ्या नोकऱ्या जे निर्माण करू शकतील अशा उच्चविद्याप्राप्त विदेशी नागरिकांनासाठीच “एच 1-बी’व्हिसाचा उपयोग केला जावा.
“एच 1-बी’अंतर्गत दरवर्षी केवळ 65 हजार जणांना अमेरिकेत प्रवेश दिला जाईल. त्यातील पहिल्या 20 हजार जणांमधून केवळ अमेरिकेतील उच्च शिक्षण घेतलेल्यांना सूट दिली जाणार आहे. अमेरिकेतील कंपन्या केवळ अमेरिकनांनाच नियुक्त करण्याचा नियम पाळू शकतील की नाही, याचा अंदाज घेण्यासाठी कंपन्यांना 120 दिवसांची मुदतही दिली गेलेली आहे. त्यानंतर कंपन्यांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे.