वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक या चायनीज ऍपवर अमेरिकेत बंदी घालण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. येत्या 45 दिवसांत ही बंदी प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. भारताने टिकटॉकवर पहिल्यांदा बंदी घातली होती.
या ऍपसह एकूण 106 चिनी ऍपवर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन भारताने बंदी घातल्याच्या निर्णयाचे अमेरिकेनेही स्वागत केले होते. त्या पाठोपाठ अमेरिकेनेही ही बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे समर्थन करताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की या चिनी ऍपमुळे देशाची राष्ट्रीय सुरक्षा, विदेश नीति, आणि अर्थकारण धोक्यात येण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेणे भाग पडत आहे.
टिकटॉक व्हिडीओ शेअरींग मोबाईल ऍप आहे. ते वापरणाऱ्या व्यक्तीची सारीच माहिती त्यातून चीन सरकारला मिळू शकत होती. या ऍपचा वापर करून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून बदनामीचीही मोहीम सुरू केली जाण्याचा धोका होता. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अशा स्वरूपाचे अन्य निर्णय घेण्याचे अधिकार ट्रम्प यांनी वाणिज्य मंत्र्यांना दिले आहेत.