वॉशिंग्टन – करोनामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर झालेला दुष्परिणाम बाजूला सारण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने तब्बल 2 ट्रिलियन डॉर्लर्सच्या आर्थिक पॅकेजच्या अंमलबजावणीला आता सुरूवात केली आहे. त्या पॅकेजच्या प्रस्तावावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्यानंतर आता हा पैसा त्या संबंधीच्या उपाययोजनांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध झाला आहे.
देशावरचे हे संकट लक्षात घेऊन तेथील रिपब्लीकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी एकत्र येऊन हे पॅकेज निश्चित केले. त्याबद्दल ट्रम्प यांनी या दोन्ही पक्षांच्या सदस्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आपत्तीच्या काळात जाहीर झालेले अमेरिकेच्या इतिहासातील हे पहिले मोठे आर्थिक पॅकेज आहे.
दरम्यान अमेरिकेत काल एकाच दिवशी करोनाचे तब्बल 18 हजार नवीन रूग्ण आढळून आल्याने त्या देशाचे प्रशासन हतबल झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या नवीन केसेस मुळे अमेरिकेतील करोनाग्रस्तांची संख्या तब्बल एक लाखावर जाऊन पोहचली असून मृतांची संख्याही 1500 वर जाऊन पोचली आहे. बहुतांश अमेरिका आज ठप्प अवस्थेत आहे. यातून आपण लवकरच बाहेर पडू असा विश्वास अमेरिकेच्या प्रशासनाने व्यक्त केला असला तरी ज्या प्रमाणात या रोगाचे रुग्ण तेथे आढळून येत आहेत ते पहाता इतक्यात ही साथ तेथे आटोक्यात येण्याची शक्यता नाही असेही सांगितले जात आहे.