वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून आपली अध्यक्षपदाची हौस सोडलेली नाही. सन 2024 च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपण पुन्हा उभे राहणार आहोत असे त्यांनी आज येथे बोलताना सूचित केले आहे. फ्लोरिडात ओर्लेन्डो येथे एका राजकीय कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे सूचित केले आहे.
रिपब्लीकन पक्षाच्या खासदारांमध्ये आणि प्रतिनिधींमध्ये अधिक एकी असण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेच्या विद्यमान अध्यक्षांवर टीका करताना ते म्हणाले की आम्ही अमेरिका फर्स्ट म्हणत होतो पण महिनभरातच त्यांनी अमेरिका लास्ट केली आहे.
ट्रम्प यांनी वॉशिंग्टन मधील राजकीय हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्यामुळे रिपब्लीकन पक्षातच त्यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली गेल्याने ट्रम्प हा पक्ष सोडून नवीन राजकीय पक्ष स्थापन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण आज येथे बोलताना त्यांनी ही शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली. अशा प्रकारच्या कृतीमुळे आपल्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफूट होईल ती टाळली पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सन 2022 ला होंणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये आपण डेमोक्रॅटिक पक्षाला पराभूत करण्यासाठी सिद्ध रहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. दरम्यान याच कार्यक्रमात रिपब्लीकन पक्षाच्या अन्य वरीष्ठ नेत्यांनी सन 2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प हे उभे राहणार असतील तर त्यांना पाठिंबा देण्याचा मनोदय व्यक्त केला.