वॉशिंग्टन: अमेरिकेत वॉशिंग्टन शहरात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काल काही निदर्शकांनी विटंबना केल्याचा प्रकार घडला आहे. त्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य अमेरिकन संसद सदस्यांनी निषेध केला आहे.
भारतीय दुतावासाजवळच हा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्यावर विचित्र रंग ओतून आणि काही अपशब्द लिहून त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीला आला. अमेरिकेत सध्या एका कृष्णवर्णीय कैद्याची पोलीस कोठडीत हत्या झाल्याचा प्रकार झाल्यानंतर देशभर निदर्शने सुरू आहेत. त्याच संबंधातील निदर्शने वॉशिंग्टन येथेही सुरू असताना तेथे हा प्रकार घडला.
हा प्रकार पाहून अध्यक्ष ट्रम्प अतिशय निराश झाले आहेत, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांच्या गोटातून देण्यात आली असून अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांनीही या प्रकाराबद्दल भारताची माफी मागितली आहे. एका अमेरिकन सिनेटरने म्हटले आहे की, या विटंबना प्रकाराशी सध्या जी निदर्शने सुरू आहेत त्याच्याशी काही एक संबंध नाही.
नॉर्थ कॅरोलिनाचे सिनेटर टॉम टिल्लीस यांनी म्हटले आहे की, गांधीजींनी शांततामय निदर्शनांची संकल्पना राबवली होती. त्याच संकल्पनेतून बदल होऊ शकतो, पण दंगली, लुटालूट, आणि हुल्लडबाजीने काहीही साध्य होणार नाही. अमेरिकेच्या विदेश व्यवहार मंत्रालयानेही या प्रकाराचा निषेध केला असून त्यांनी म्हटले आहे की, यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभाग योग्य ती कारवाई करीत आहे असे त्यांनी म्हटले आहे.