वॉशिंग्टन : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेतील मोठ्या भूभागावर सध्या सार्वजनिक निर्बंध आहेत. मात्र लवकरच हे निर्बंध हटवण्याच्या योजनेला आपण अंतिम रुप देणार असल्याचे सूतोवाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. अमेरिकेतील 330 दशलक्ष लोकसंख्येपैकी जवळ जवळ 95 टक्के लोकांना सध्या घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिन्याभरासाठी म्हणजे 30 एप्रिलपर्यंत सामाजिक एकत्रीकरणावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
तज्ञ व्यक्तींशी आपण चर्चा करत आहोत आणि हे निर्बंध हटवून लवकरच देशातील यंत्रणा खुली केली जाईल. कदाचित नियोजित वेळापत्रकाच्याही आगोदर ही योजना आणली जाणे महत्वाचे आहे, असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करोना विषाणूसंदर्भातील पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्हाला आमचा देश खुला करायचा आहे. आम्हाला परत सामान्य जीवन हवे आहे. आम्हाला देशात यशस्वीपणे चांगले वातावरण परत आणायचे आहे. अगदी थोड्याच दिवसात त्यासाठीची उपाय योजना आम्ही नक्की करू, असे ट्रम्प म्हणाले.
काही क्षेत्रातील मान्यवरांबरोबर चर्चा करून अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्याच्या उपाय योजनांबाबत नियोजन केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेच्या अर्थकारणावर करोनाच्या प्रादुर्भावामुळे खूपच परिणाम झाला आहे. न्यूयॉर्कवर हा परिणाम सर्वाधिक झाला आहे. पर्यटन आणि प्रवासी वाहतुकीचे उद्योग थंड पडले आहेत. लक्षावधी लोकांचा रोजगार बुडाला आहे. अर्थकारणाला चालना देण्यासाठी 2.2 ट्रिलीयन डॉलर खर्च झाले आहेत. मात्र याचा अद्याप काहीही सकारात्मक परिणाम झालेला नाही.