वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाच्या संबंधात जागतिक आरोग्य संघटनेच्या ढिसाळपणावर जोरदार ताशेरे मारले असून या संघटनेच्या निष्काळजीपणामुळेच जगभर करोनाची लागण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संघटनेचा निधी थांबवण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. 31 डिसेंबर रोजीच तैवानने जागतिक आरोग्य संघटनेला करोना विषाणींच्या प्रादुर्भावाबद्दल जागृत केले होते पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, तैवानच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जगाला वेळीच सावध केले असते तर हा प्रसंगच उद्भवला नसते असे अमेरिकेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या बाबतीत खूप विलंब केला आणि त्यातून करोनाचा प्रसार वाढला असे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान ट्रम्प यांची ही धमकी आणि इशारा म्हणजे निव्वळ स्वताच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठीचा कांगावा आहे असे त्यांच्या विरोधकांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी स्वताचे अपयश झाकण्यासाठी एका विदेशी संस्थेला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न चालवला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 14 जानेवारी रोजी एक निवेदन जारी करून करोना हा एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला संक्रमित होणारा रोग नाही असे म्हटले होते.
या संघटनेची ही माहिती दिशाभूल करणारी ठरली आहे. वास्तविक करोना हा एका माणसापासून दुसऱ्या माणसात संक्रमित होणारा विषाणू आहे असा स्पष्ट इशारा तैवानने 31 डिसेंबर रोजी जागतिक बॅंकेला लेखी स्वरूपात कळवला होता. पण त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने जगभरात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत असे अमेरिकेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासन आता जागतिक आरोग्य संघटनेला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत आहे.