लक्षवेधी: मधुचंद्राचा तिसरा अंक जोरात…

स्वप्निल श्रोत्री

ट्रम्प आणि किम हे काही वैचारिक पातळी असलेले नेते नाहीत. किंबहुना ते काय करतील याचा अंदाजही बांधणे शक्‍य नाही. त्यामुळे एकत्र आल्यावर ते नक्‍की काय करतात हेच बघणे जास्त महत्त्वाचे असते.

जी – 20 च्या वार्षिक बैठकीला उपस्थिती लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या चंचल स्वभावाला अनुसरून वर्तन करीत अचानक उत्तर व दक्षिण कोरियाच्या सीमेवरील बिगर सैन्य क्षेत्रात असलेल्या पॅनमुंजोम या गावात उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते व शासक किम जोंग उन यांची भेट घेतली. कोरियन द्वीपकल्पाला अण्वस्त्रमुक्‍त करण्यासंबंधी उभय नेत्यांत झालेल्या द्विपक्षीय चर्चेअंती ट्रम्प यांनी किम यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले. गेल्या वर्षभरात ट्रम्प आणि किम ह्यांच्यातील ही तिसरी भेट असून पहिल्या दोन भेटीपेक्षा ही भेट अनेक अर्थांनी सार्थकी लागली असेच म्हणावे लागेल. काही दिवसांपूर्वी माझ्या टेबलावर अण्वस्त्रांचे बटन असून त्याचा रोख अमेरिकेकडे आहे, असे निडरपणे सांगणारे किम एकाएकी शांत झाले. किम यांना हे काही एका रात्रीत सुचलेले शहाणपण नसून त्यामागे चहूबाजूने उत्तर कोरियाची आर्थिक कोंडी हेच खरं कारण आहे.

सुरुवातीला अमेरिका त्यानंतर युरोपियन महासंघ आणि ऑस्ट्रेलिया यांनी घातलेले आर्थिक निर्बंध व जागतिक राजकारणात व्यापारी मक्‍तेदारी असलेल्या राष्ट्रांशी दुरावलेले संबंध या दुहेरी कात्रीत उत्तर कोरिया सापडली होती. त्याशिवाय सन 1950 पासून उत्तर कोरियाला तन-मन-धनाने मदत करणाऱ्या चीनने अचानक घेतलेला आखडता हात व चीनचा उत्तर कोरियाच्या अंतर्गत बाबीत वाढता हस्तक्षेप यावर उपाय म्हणून किम यांनी एक पाऊल मागे येण्याचे ठरविले.
किम व त्यांच्या परिवाराचा इतिहास पाहता ते अमेरिकेवर अण्वस्त्रे डागणार नाहीत याची शाश्‍वती कोणीही देऊ शकत नाही.

आपल्याकडे आंतरखंडीय अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे आहेत व त्यांची पोहोच अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत आहे ही किम यांनी वाजवलेली टिमकी ट्रम्प यांच्याही मनात धडकी भरवित होती. एक अणुबॉम्ब काय करू शकतो याचा प्रत्यय अमेरिकेने जगाला सन 1945 ला हिरोशिमा व नागासाकीवर हल्ला करून दाखवून दिला होता; परंतु आजच्या तांत्रिक युगात महाभयंकर क्षेपणास्त्राचे तांडव कोणत्याही राष्ट्राला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे आपल्या टेबलावर किमपेक्षाही अण्वस्त्रांचे मोठे बटन आहे, अशी दर्पोक्‍ती करणारे व किम यांना “मिसाइल मॅन’ म्हणून हिणविणारे ट्रम्प नमते झाले हेही तितकेच सत्य आहे.

आजच्या घडीला लष्करी बळाचा विचार केला तर उत्तर कोरिया हे जपान व दक्षिण कोरिया यांच्यापेक्षा अनेक बाजूंनी बलाढ्य आहे. किम जोंग उन पासून या दोन राष्ट्रांचे रक्षण करण्याची जबाबदारी जरी अमेरिकेने आपल्या खांद्यावर घेतली असली तरीही आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या अमेरिका आपल्या बाजूला लागूनच असलेली उत्तर कोरियापासून व त्यांच्या अण्वस्त्रांपासून रक्षण कसे करू शकेल हा जपान आणि दक्षिण कोरियाला पडलेला प्रश्‍न रास्त आहे. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळण्यापेक्षा ते मिटवण्याचा प्रयत्न या राष्ट्रांनी गेल्या वर्षभरापासून केल्याचे दिसून येते. उदाहरण म्हणून आपण दक्षिण कोरिया येथे फेब्रुवारी 2018 ला झालेल्या विंटर ऑलिंपिक स्पर्धांकडे पाहू शकतो. तेथील स्पर्धांसाठी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून यांनी किम व त्यांच्या परिवाराला विशेष निमंत्रित केले होते. दोन्ही राष्ट्रांचे एकत्रित संघ पहिल्यांदाच स्पर्धेत उतरले होते. दुसरीकडे जपाननेही चीनशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तर कोरियाचा विचार करता त्यांचा भूभाग हा उच्च प्रतीच्या कोळशाच्या खाणींनी समृद्ध आहे. संपूर्ण जगाचे आर्थिक निर्बंध व टीकेचा धनी ठरवूनही या कोळशाने उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला तारले. मात्र, आता हे साठे संपू लागले आहेत. उत्तर कोरियाचा जीडीपी 25 मिलियन डॉलरवर येऊन थांबला आहे. तेथील तरुणांमध्ये रोजगाराचा व समाजामध्ये स्थैर्याचा आणि आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे अशा परिस्थितीत किमचे राष्ट्रप्रेमाचे भावनिक डोस काम करेनासे झाले आहेत.

जवळपास सव्वालाख किलोमीटर असलेले क्षेत्रफळ व जवळपास 8 कोटींच्या घरात असलेली लोकसंख्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने चांगले “मार्केट’ बनू शकते याची जाणीव अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना व उत्तर कोरियाच्या राज्यकर्त्यांना आहे व तसे प्रयत्न यापूर्वीही झालेले आहेत. मात्र, मनात हुक्‍की आल्यावर उत्तर कोरियाच्या राज्यकर्त्यांनी त्यावर नांगर फिरविल्याचीही इतिहासात उदाहरणे आहेत. आजच्या घडीला उत्तर कोरियात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शिरकाव दोघांच्या दृष्टीने फायद्याचाच आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचा डबघाईला आलेला जीडीपी, वाढती बेकारी आणि त्यामुळे येणारी गुन्हेगारी नियंत्रणात येणे शक्‍य होईल.

शेवटी सर्व गोष्टींचा सारासार विचार करता, किम आपली अण्वस्त्रे काही शर्तींवर सोडण्यास तयार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेला घातलेला अटींचे ट्रम्प व अमेरिकेच्या यापुढील अध्यक्षांकडून पालन होणे गरजेचे आहे. अमेरिकेने तातडीने उत्तर कोरियावर लावलेले सर्व निर्बंध हटविण्याबरोबरच उत्तर कोरियावर अमेरिका किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांपैकी कोणी हल्ला करणार नाही याची शाश्‍वती किम यांना देणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत खात्री होत नाही, तोपर्यंत किम आपली भूमिका बदलणार नाहीत. त्यामुळे नुसत्या भेटीगाठी घेऊन विषय मार्गी लावण्यापेक्षा कृतीची जोड आवश्‍यक आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)