वॉशिंग्टन – मिशीगन प्रांतातील मतमोजणी रोखण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मतमोजणीसाठी आपल्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी. त्यानंतरच तेथील मतमोजणीला प्रारंभ करण्यात यावा, अशी मागणी ट्रम्प यांच्यावतीने करण्यात आली आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी ठिकाणी ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना योग्य वेळी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे मतपेट्या उघडणे आणि मतमोजणीच्यावेळी ट्रम्प यांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकले नव्हते, असा आरोप ट्रम्प यांचे प्रचार व्यवस्थापक बिल स्टीफन यांनी केला आणि मतमोजणी थांबवण्यासाठी मिशीगनमधील न्यायालयात याचिका दाखल केली गेली असल्याचेही सांगितले.
ज्या मतपेट्या ट्रम्प यांच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत उघडण्यात आल्या, त्यांची फेरमोजणी करण्याची मागणीही या याचिकेत केली गेली आहे. विस्कोन्सिन येथील मतमोजणी नव्याने करण्याची मागणीही ट्रम्प यांनी केली आहे. विस्कोन्सिन येथे बिडेन यांनी विजय मिळवला आहे.
काही महत्वाच्या राज्यांमधील मतमोजणी अद्याप बाकी आहे. त्याठिकाणीही ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना योग्य प्रवेश दिला जायला हवा, असा आग्रहही ट्रम्प यांच्यावतीने धरला गेला आहे. निवडणूकीमध्ये ट्रम्प आणि बिडेन या दोघांच्याही वतीने विजयाचा दाव केला जाऊ लागला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार बिडेन यांना 264 इलेक्टोरल व्होट मिळाले आहेत. तर ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल व्होट मिळाले आहेत.