वाशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी आणि अन्य वर्क व्हिसा वरील बंदी 31 मार्च पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे भारतीय आयटी व्यवसायिकांची मोठी अडचण होणार आहे.
करोना प्रादुर्भावापासून अमेरिकन नागरीकांचे संरक्षण करणे आणि अमेरिकन नागरीकांचा रोजगार शाबूत ठेवण्यासाठी ही उपाययोजना केली जात असल्याचे अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे.
ट्रम्प यांनी 22 एप्रिल आणि 22 जून रोजी ही व्हीसा बंदी लागू केली होती. ती मुदत काल 31 डिसेंबरला संपणार होती पण त्याची मुदत वाढवण्यात आल्याने अमेरिकन आणि भारतीय कंपन्यांनाही मोठा फटका बसणार आहे.
अमेरिकन आयटी कंपन्या चीन आणि भारतातून हजारो कर्मचारी या एच वन बी व्हिसावर अमेरिकेत नोकरीसाठी पाचारण करीत असतात. आता या बंदीमुळे त्यांना भारत आणि चीन मधून नवीन कर्मचारी भरती करता येणार नाहीत त्याच बरोबर त्यांच्या जुन्या व्हिसाचेही नुतनीकरण करता येणार नाही.
आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, कोविडचा अमेरिकन लेबर मार्केट आणि अमेरिकन लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाला असून ती आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. ही चिंता अद्याप कायम असल्याने आम्हाला या बंदी आदेशाची मुदत वाढवावी लागत आहे.