PM Modi USA Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींची भेट घेतली. ट्रम्प-मोदी यांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद देखील पार पडली. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवले जाणार असल्याची माहिती दिली.
तहव्वूर राणा हा 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत बऱ्याच काळापासून करत होता. त्याच्यावर डेव्हिड हेडलीला मदत केल्याचे गंभीर आरोप आहेत. त्याने या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर रेकी करण्यासाठी मदत केली होती.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या न्यायालयाने राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मंजूरी दिली होती. याबाबत माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, ‘मला हे घोषित करताना आनंद होत आहे की आमच्या प्रशासनाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या दोषी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली आहे. आता तो भारतात जाऊन न्यायाला सामोरे जाईल.’
#WATCH | Washington, DC | PM Narendra Modi says, “India and America have been together in the fight against terrorism. We agree that solid action must be taken to eliminate terrorism that originates on the other side of the border. I am thankful to the president that he has… https://t.co/8eXAFXqCvJ pic.twitter.com/PF9PLo1786
— ANI (@ANI) February 13, 2025
ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींनी देखील त्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, ‘दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आणि अमेरिका एकत्र उभे राहतील. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे, यावर आमची पूर्ण सहमती आहे. 2008 मध्ये भारतात नरसंहार घडवणाऱ्या गुन्हेगाराला भारताच्या हवाली करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी राष्ट्रपतींचे आभार मानतो. भारतातील न्यायालय त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करतील.’
दरम्यान, जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. न्यायालयाने या प्रकरणातील त्याची पुनरावलोकन याचिका फेटाळली होती. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या घोषणेनंतर लवकरच राणाचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे.