मोदींशी चीनबाबत चर्चा केल्याचा ट्रम्प यांचा दावा

वॉशिंग्टन: चीन बरोबरच्या तणावाच्या विषयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तथापि चीन बरोबरच्या वाढलेल्या तणावाबाबत मोदी हे चांगल्या मुडमध्ये नव्हते अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.

व्हाईट हाऊसमधून पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि चीन हे मोठे देश आहेत. दोघांचीही लोकसंख्या प्रत्येकी एकशे चाळीस कोटींची आहे. त्यांच्याकडे शक्तिशाली लष्करही आहे. पण आज चीन भारतावर खूष नाही आणि भारतही चीनवर खूष नाही त्यामुळे त्यांच्यात ही तणावाची स्थिती निर्माण झाली आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. या विषयावर मी भारताच्या पंतप्रधानांशी बोललो आहे असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. चीनशी असलेल्या संबंधांबाबत मोदी फारसे खूष दिसले नाहीत त्यामुळे ते चांगल्या मूड मध्ये नव्हते असेही ट्रम्प म्हणाले. मोदी हे सभ्य गृहस्थ आहेत आणि ते चांगले काम करीत आहेत त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत असे मतही ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केले.

कालच अध्यक्ष ट्रम्प यांनी या वादाबाबत दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. तथापि त्यावर प्रतिक्रिया देताना भारताने अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली होती. आम्ही चीनशी चर्चा करून शांततेच्या मार्गाने यावर तोडगा काढू अशी प्रतिक्रिया भारताने दिली आहे. चीनने मात्र अजून अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावाला अधिकृतपणे प्रतिसाद दिलेला नाही. भारत आणि चीन यांच्या लष्करात 5 मे रोजी झालेल्या संघर्षात दोन्ही देशांचे सुमारे शंभर सैनिक जखमी झाले आहेत. हा संघर्ष लढाक सीमेवर झाला आहे तसाच संघर्ष उत्तर सिक्कीम सीमेवरही 9 मे रोजी झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.