वॉशिंग्टन – करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये करण्यात आलेले करोना चाचण्यांच्या कामाचे कौतुक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी पूर्वीच्या सरकारच्या काळात स्वाईन फ्लूची साथ पसरलेली असताना अतिशय वाईट नियोजन केल्याची टीकाही ट्रम्प यांनी केली.
‘आतापर्यंत अमेरिकेमध्ये भारतापेक्षाही जास्त करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर भारतासारख्या अनेक देशांनी मिळून केलेल्या चाचण्यांपेक्षाही अमेरिकेने केलेल्या चाचण्या जास्त आहेत. भारताने केलेल्या चाचण्यंची संख्या जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेने भारतापेक्षा तब्बल 44 दशलक्ष जास्त चाचण्या केल्या आहेत. भारतामध्ये 1.5 अब्ज लोकसंख्या आहे. भारताचे पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला फोन करून चाचण्यांबाबत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.’ असे ट्रम्प म्हणाले. नेवाडामधील रेनो इथे निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते.
अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या राज्यांमध्ये ट्रम्प सध्या धावता दौरा करत आहेत. त्यात नेवाडा इथे बऱ्यापैकी चांगला वेळ ते घालवत आहेत.