रशियाशी संगनमत असल्याचा केला होता आरोप
न्यूयॉर्क: वर्ष 2016 मधील अमेरिकी अध्यक्षीय पदाच्या डेमोक्रेटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पराभूत करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी हातमिळवणी केल्याचे निराधार वृत्त छापल्याप्रकरणी “ट्रम्प कॅम्पेन’ (डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचारमोहीम) यांच्यातर्फे न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राच्या विरोधात बुधवारी गुन्हा नोंदविला आहे.
या वृत्तपत्राने 2016 च्या निवडणुकीदरम्यान वरीलप्रमाणे खोटे वृत्त मार्च 2019 मध्ये ओपिनियन सेक्शनमध्ये “द रियल ट्रम्प-रशिया क्विड प्रो क्यू’ मथळयासह प्रकाशित केले होते. हा लेख न्यूयॉर्क टाईम्सचे माजी कार्यकारी संपादक मॅक्स प्रॅंकेल यांनी लिहिला होता. लेखात त्यांनी ट्रम्प यांचे काही अधिकारी अणि रशियन प्रतिनिधी यांच्यातील कथित संभाषणाचा उल्लेख केला होता. ट्रम्प कॅम्पेन आणि रशियन अधिकाऱ्यांनी हिलरींना पराभूत करण्यासाठी संगनमत केल्याचे प्रॅंकेल यांनी नमूद केले होते.
हा लेख कुठल्याही पुराव्याशिवाय प्रकाशित करण्यात आला होता असा दावा ट्रम्प यांचे वरिष्ठ कायदेशीर सल्लागार जेना इलिस यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या विरोधात हेतुपुरस्पर चुकीचे वृत्त छापल्याप्रकरणी वृत्तपत्राला उत्तरदायी ठरविणे हा खटल्याचा उद्देश आहे. न्यूयॉर्क टाईम्सचे वृत्त धादांत खोटे असल्याचे इलिस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, न्यूयॉर्क टाइम्स हे वृत्तपत्र या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार आहे. ट्रम्प कॅम्पेनने ओपिनियन रायटरला स्वतःच्या विचारांसाठी शिक्षा मिळवून देण्याच्या हेतूने न्यायालयात धाव घेतली आहे. देशाचा कायदा नागरिकांचे अधिकार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करतो. विशेषकरून सार्वजनिक घटनांवर आम्ही उघडपणे मत मांडू शकतो असे वृत्तपत्राचे प्रवक्ते एलीन मर्फी यांनी म्हटले आहे.