पुणे – चालकाचा ताबा सुटल्याने सीमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकची आठ वाहनांना धडक बसली. हा विचित्र अपघात नवले पुलाच्या जवळ झाला. यात एका महिलेसह दोघे जखमी झाले. दुपारी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या घटनेने या रस्त्याची धोकादायक अवस्था अधोरेखीत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कात्रजकडून सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उतारावरुन जात असताना त्याचा ताबा सुटला. या ट्रकने रस्त्यावरील चारचाकी आणि दुचाकी वाहनांना धडक दिली. यामुळे एकच हलकल्लोळ माजला.
मागील दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा अपघात घडल्याने नागरिक संतप्त झाले. त्यांनी क्लिनरला पकडून मारहाण केली. मात्र ट्रकचालक तेथून पळून गेला. यामध्ये सात कार व एका दुचाकीचे नुकसान झाले. अपघातग्रस्त कार रस्त्याच्याकडेला बसलेल्या एका महिलेच्या अंगावर गेल्याने ती जखमी झाली आहे.
बालेवाडी स्टेडियम येथे क्रिकेट खेळण्यासाठी निघालेली 7 ते 8 लहान मुलांच्या जीपला ट्रकने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की कार रस्त्याच्या डिव्हाईडवर जाऊन अडकली. सुदैवाने मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. अचानक झालेल्या या अपघातामुळे लहान मुले धास्तावली होती.