‘ट्रकचालकांना तातडीने ओळखपत्र द्यावे’

राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेची मागणी

पुणे – लॉकडाऊन काळात जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करण्यास परवानगी आहे, पण यात ट्रकचालकांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. त्यामुळे माल पोहोचण्यास विलंब होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जे ट्रकचालक जीवनावश्‍यक मालांची नियमित वाहतूक करत आहेत त्यांना ओळखपत्र द्यावीत, अशी मागणी राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे.

यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, किराणा व भुसार माल वेळेत जर पुणे किंवा मुंबईमध्ये पोहचला, तर त्याचे वितरण करण्यास सोपे जाते, पण सध्या लॉकडाऊनमुळे पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. यामुळे अनेक वेळा ट्रकचालकांना अडचण निर्माण होते.

मालसुद्धा वेळेत पोहोचत नाही. काही महामार्गावर तर ट्रक थांबवून घेतले जातात. हे प्रकार होऊ नयेत म्हणून संघटनेच्या सभासदांना ओळखपत्र दिली तर नक्कीच फायदा होईल. त्यासाठी संबंधित बाजार समित्यांनी पुढाकार घेतल्यास ही ओळखपत्र लवकर मिळतील. पुणे, पिंपरी-चिंचवड प्राधिकरण, वाशी, पुण्यातील के. के. मार्केट येथे हे ट्रक उभे आहेत. सध्या या ट्रक चालकांच्या जेवणाची सोय संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.