अहमदनगर – मालवाहू ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस कर्माचऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. एकनाथ रामकृष्ण बर्वे (वय 48) असे अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीसाचे नाव आहे. हा अपघात संगमनेर तालुक्यातील दिघे येथील पुलावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामकृष्ण बर्वे हे लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून जात होते. तळेगाव दिघे येथील पुलावर आले असता त्यांच्या दुचाकीला मालवाहू ट्रकने पाठीमागून धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच संगमनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. ट्रक चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास संगमनेर पोलीस करत आहेत.