TRP SCAM: पार्थो दासगुप्ता यांना 28 डिसेंबरपर्यत कोठडी

मुंबई – टीआरपी बार्कचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना 28 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवार, दि. 24 डिसेंबर रोजी रायगड येथून त्यांना अटक केली होती. पत्रकार अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक भारत हिंदी आणि रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वाहिनीचा टीआरपी कृत्रिमरित्या वाढवल्याच्या घोटाळ्यात दासगुप्ताचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

मागच्या आठवड्यात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने बार्कचा माजी अधिकारी रोमिल रामगढिया याला अटक केली होती. सहायक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर आणि सचिन वाझे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. पोलिसांनी त्याचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला होता.

रामगढिया आणि अन्य आरोपींची चौकशी केली जात असून, त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे काल, गुरुवारी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने रायगड येथून दासगुप्ताला अटक केली. आज शुक्रवार दि. 25 डिसेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत विविध वाहिन्या, हंसा कंपनी आणि बार्कचे माजी अधिकारी सामील आहेत, असे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तींची संख्या आता 15वर पोहोचली आहे. यासंबंधी विशेष पथकाकडून यापुढेही तपास सुरू राहणार असून, आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.