बीआरटी मार्गावर दरडीचे संकट

वडमुखवाडी काही भाग ढासळला : धोकादायक दरड हटविण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल ते आळंदी या मार्गावर उभारलेल्या बीआरटी मार्गालगत 50 फुटी डोंगराची कडा आहे. याचा काही भाग ढासळला असून बीआरटीमार्गालगत असलेल्या पदपथावर राडारोडा साचला आहे. या दरडीचा काही भाग काही प्रमाणात कोसळला आहे. नेमकी ही कडा पदपथावर कोसळली आहे. पावसाळ्यात डोंगरकडा आणखी सैल होऊन मोठ्या प्रमाणावर दरड कोसळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच ही सैल झालेली धोकादायक दरड हटविण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
रस्तारुंदीकरणामुळे बीआरटी मार्गालगतच्या पदपथाच्या लगतच 50 फुटांची डोंगरकडा आहे.

याशिवाय अद्यापही या परिसरात गौण खनिज उत्खनन सुरू असल्याने बसणाऱ्या हादऱ्यांमुळे ही डोंगरकडा दिवसेंदिवस सैल होत आहे. सैल झालेली कडा पदपथावर कोसळली आहे. मात्र, सुदैवाने याठिकाणी कोणी नसल्याने कोणत्याही प्रकार हानी झाली नाही. अशाच प्रकारची कडा कमी प्रमाणात या पदपथावर काही ठिकाणी कोसळल्या आहेत. या परिसरात झालेल्या सोसायट्यांमधील नागरिक मॉर्निंग वॉक व शतपावलीसाठी या पदपथावरून ये-जा करत असतात. पावसाळ्यात ही डोंगरकडा आणखी सैल होण्याची शक्‍यता असून, 50 फूट उंचीची कडा पदपथावर कोसळल्यास जीवीतहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल ते आळंदी रस्त्यापर्यंत बीआरटी मार्ग विकसित करण्यात आला आहे. या रस्त्यालगत अनेक सोसायट्या नव्याने झाल्याने शहरीकरणाने मोठा वेग घेतला आहे. याशिवाय 100 कोटींपेक्षा अधिक निधीतून चऱ्होली परिसरातील रस्त्यांची कामे सुरु आहेत. बीआरटी मार्ग विकसित करताना रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. नागरिकांसाठी प्रशस्त पदपथदेखील ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, रस्त्याचे रुंदीकरण करत असताना, वडमुखवाडी येथील संकल्प गार्डन मंगल कार्यालय व गोखले मळ्यासमोरील डोंगर फोडावा लागला. त्याचाच गैरफायदा घेत, अनेक समाजकंटकांनी या डोंगराच्या मागील बाजूची लचकेतोड करत, परवानगीपेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन केले आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. परंतु तरीही हे प्रकार थांबले नसून या प्रकारांचे धोकादायक परिणाम समोर येत आहेत.

या परिसरात होणाऱ्या डोंगराच्या लचकेतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईत सातत्य राहणे आवश्‍यक आहे. याठिकाणी दरड कोसळून प्राणहानी झाल्यानंतरच तहसीलदार कार्यालय व महापालिका प्रशासन याची दखल घेणार आहे.

– अंकुश तापकीर, भोसरी विधानसभा अध्यक्ष, मनसे

रस्त्याची रुंदीप्रमाणे याठिकाणी डोंगर फोडण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी डोंगरकडा कोसळण्याची शक्‍यता आहे. त्याकरिता महापालिकेच्या वतीने या डोंगरकडा कोसळू नये, याकरिता उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजनांतर्गत संरक्षक जाळी बसविली जाणार आहे.

– विजय भोजने, प्रवक्‍ता, बीआरटीएस पिं.चिं. महापालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.