श्रीनगर : जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील सीमावर्ती भागात कार्यरत असणाऱ्या कोणत्याही जवानाला करोनाचा संसर्ग झाला नसल्याचा खुलासा लष्कराने शनिवारी केला. करोनाची बाधा झाल्यानंतर उपचारामुळे बरे होऊन कामावर रूजू झालेल्यांना सेवेत तात्पुरती कार्ये सोपवण्यात आली आहेत.
ऑपरेशन नमस्ते अंतर्गत नागरी प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्राशी समन्वय ठेवत लष्कराचा उत्तर विभाग करोनाला अटकाव करण्यासाठी कार्यरत आहे. लेहपासून कोठेही आमच्या सीमावर्ती भागात कोणत्याही जवानाला करोनाची बाधा झाली नाही.
सीमावर्ती भागात आमचे जवान पाय रोवून ठामपणे पहारा देत आहेत. लष्कराचे जवान कोणत्याही करोनाबाधिताच्या संपर्कात येत नाहीत. तसेच सर्व संशयितांवर नॉर्दन कमांडच्या उधमपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, असे लष्कराचे प्रवक्ते ले. कर्नल अभिनव नवनीत यांनी सांगितले.