पाबळमध्ये टोळक्‍याकडून सैनिकाला मारहाण

शिक्रापूर-देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबाबत नागरिकांमधून समाधान व सैनिकांबाबत आदराची भावना जपली जात असताना सुट्टीसाठी आलेल्या सैनिकाला किरकोळ कारणातून पाच जणांच्या टोळक्‍याने मारहाण केली असल्याची घटना शिरूर तालुक्‍यातील पाबळ येथे घडली.

प्रदीप चंद्रकांत खैरे (रा. खैरेनगर ता. शिरूर) असे मारहाण झोलल्या सैनिकाचे नाव असून त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार संदीप प्रकाश बगाटे, श्रीधर बगाटे तसेच अनोळखी तीन युवक (सर्व रा. पिंपळवाडी पाबळ, ता. शिरूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. सुट्टीसाठी गावी आलेले सैनिक प्रदीप खैरे हे त्यांचा मित्र योगेश गवारे याच्यासोबत चायनीज खाण्यासाठी गेलेले होते. यावेळी प्रदीप यांनी त्यांच्या एका मित्रासोबत फोनवर बोलत असताना समोरील मित्राला शिवीगाळ केली.

यावेळी या चायनीज सेंटरमध्ये शेजारील टेबलवर चायनीज खात असलेल्या संदीप बगाटे याने प्रदीप यांना कोण आहे रे? असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी प्रदीप यांनी मी तुम्हाला शिव्या दिल्या नाहीत, मी सैनिक असून मला भांडणामध्ये इंटरेस्ट नाही, असे म्हटले. संदीप सोबत असलेल्या दोघांनी तू मिलेटरीमध्ये आहे तर आम्ही काय करू? असे म्हणत श्रीधर बगाटे याने तेथील खुर्च्या घेऊन प्रदीप यांना मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच इतर तिघांनी देखील लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली असल्याची घटना घडली. या मारहाणीत प्रदीप हे जखमी झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे हे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.