आठ वर्षे काम रखडल्याने सव्वातीन कोटी अधिक मोजावे लागणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या स्पाइन रस्त्यावरील त्रिवेणीनगर येथील उर्वरित कामाचा खर्च सव्वातीन कोटीने वाढला आहे. येथील काम होऊ न शकल्याने आठ वर्षांमध्ये कामाच्या खर्चात 62 टक्क्यांहून आधिक वाढ झाली आहे.
प्राधिकरणाने जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग यांना जोडणाऱ्या 9.75 किलोमीटर स्पाइन रस्त्याचे काम 31 डिसेंबर 2010 मध्ये पूर्ण केले. निगडी, प्राधिकरण, मोशी, चिखली आदी परिसराला हा रस्ता जोडतो. रस्त्यामध्ये त्रिवेणीनगर येथील नियोजित जागेचा ताबा न मिळाल्याने तेथील रस्त्याचे काम रखडले.
संबंधित रस्त्याच्या कामासाठी 2012-13 मध्ये 5.23 कोटी रुपये इतका खर्च मंजूर होता. सध्या 2020-21 हे आर्थिक वर्ष सुरू आहे. दरम्यान, येथील रस्त्याच्या कामासाठी सध्याच्या जिल्हा दरसूचीनुसार 8 कोटी 50 लाख इतका खर्च निश्चित केला आहे. रस्त्याच्या कामाचे सुधारित अंदाजपत्रक प्राधिकरण प्रशासनाने तयार केले आहे. 330 मीटर लांबी असणारा आणि 75 मीटर रुंदी असलेला रस्ता बनविण्यासाठी हा खर्च लागणार आहे. लगतच्या प्राधिकरण सभेत हा विषय मंजूरीसाठी आहे. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर ई-निविदा मागवून रस्त्याचे काम केले जाणार आहे.
रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना पर्यायी भूखंड दिला जाणार असल्याने त्यांची गैरसोय दूर होणार आहे. महापालिकेकडून रस्त्यासाठी आवश्यक जागा मोकळी करून देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याचे काम प्राधिकरणाकडून केले जाईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
स्पाइन रस्त्याच्या कामामध्ये त्रिवेणीनगर येथे बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकरणाने महापालिकेला चिखली, पेठ क्रमांक 11 येथील भूखंड हस्तांतरित केला आहे. रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांना या भूखंडाचे वितरण केले जाईल.
– मनीषा कुंभार, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण