अटकपूर्व जामीन मंजूर ः ठाणे पोलीसांचा पहिला खटला असल्याचा होता दावा
मुंबई (प्रतिनिधी) – वॉटस् ऍपद्वारे तिहेरी तलाक दिल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मुंब्रा येथील इम्तियाज पटेल याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. नव्याने मंजूर केलेला तिहेरी तलाक कायदा, मुस्लिम महिला (विवाह संरक्षणविषयक अधिकार) 2019 कायद्यान्वये ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या या पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने 25 हजार रुपयांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
इम्तियाज पटेल याचा विवाह एका उच्च शिक्षीत महिलेशी झाला. ती गर्भवती असतानाच माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मला दुसरे लग्न करायचे आहे, असे सांगून इम्तियाजने तिला गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये व्हाट्स ऍपवर तिहेरी तलाक दिला.
त्यानंतर राष्ट्रपतींनी 1 जुलैला संसदेत मंजूर करण्यात आलेल्या आणि कायद्यात बदल करण्यात आलेल्या तिहेरी तलाक विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यानंतर पत्नीने पटेल विरोधात 2 ऑगस्टला तक्रार दाखल केली. त्यानंतर तिहेरी तलाक विरोधात देशातील पहिलाच गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी अटक होण्याची शक्यता असल्याने इम्तियाजने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी इम्तियाजच्या वतीने युक्तीवाद करताना ऍड. अतिर शेख यांनी इम्तियाज आणि त्याची पत्नी यांच्यात वैवाहिक वाद होता. त्या रागाच्या भरात वॉटस ऍपद्वारे झटपट तलाक घोषित केला होता.
गेल्या वर्षी दिलेला तलाक नवीन कायदा पाहता अवैध व बेकायदेशीर आहे. परंतू आता तो मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे न्यायालयाच्या निर्दश आणून दिले. याची दखल घेत न्यायालयाने इम्तियाजला 25 हजाराचा सशर्त जामीन मंजूूर करताना आरोपीच्या पत्नीला प्रतिवादी करण्याचे निर्देश देताना 28 ऑगस्टला पुढील सुनावणीच्यावेळी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.
तसेच पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याबरोबरच 20, 21, 22 ऑगस्टला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश देताना कोणत्याही सोशल मीडिया वेबसाईटवर पत्नीविरूद्ध कोणत्याही प्रकारची अपमानास्पद शेरेबाजी करू नये किंवा पोस्ट टाकू नये, अशी तंबीही न्यायालयाने दिली.