पुणे – शहरात कार्तिक अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिर, घरोघरी तसेच झाडांचे पार अशा ठिकाणी दीपोत्सवाद्वारे हा उत्सव साजरा करण्यात आला.
शहरातही अनेक ठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन केले होते. तुळशीबागेतील पेशवेकालीन शिवमंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये एक पणती पूर्वजांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने परिसरात पाच हजार पणत्या लावण्यात आल्या. महापौर मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
याप्रसंगी कला, अध्यात्म, शिक्षण, गोपालन, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि साध्या पद्धतीने अन्नकोट आयोजित केला होता.
गणपतीला फळ-भाज्यांसह मिठाई, फराळाच्या तिखट-गोड निवडक पदार्थांचा अन्नकोट आणि सभामंडपात व मंदिर परिसरात लावलेल्या शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने दगडूशेठ गणपती मंदिर उजळून निघाले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते कळसापर्यंत 51 हजार दिव्यांची केलेली सजावट लक्षवेधी ठरली.