आगरतळा – त्रिपुरामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. राज्यात झालेल्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीत भाजपने 97 टक्के जागा जिंकल्या आहेत. एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, भाजपने ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये 71 टक्के जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. उर्वरित 29 टक्के जागांसाठी 8 ऑगस्टला मतदान झाले. गृहमंत्री अमित शहा यांनीही त्रिपुरा भाजपचे अभिनंदन केले आहे.
निवडणुकीचा निकाल काय लागला?
भाजपने 606 पैकी 584 ग्रामपंचायती, 35 पैकी 34 पंचायत समित्या आणि आठ जिल्हा परिषदांवर विजय मिळवला आहे. आठ जिल्हा परिषदांच्या 96 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपने 93 जागा जिंकल्या, तर काँग्रेस आणि माकपने अनुक्रमे दोन आणि एक जागा जिंकली. तर 1,819 ग्रामपंचायत जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 1,476 जागा जिंकल्या. सीपीआय(एम), काँग्रेस आणि टिपरा मोथा यांना अनुक्रमे 148, 151 आणि 24 जागा मिळाल्या.
जनतेचा पंतप्रधान मोदींवर विश्वास –
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पक्षाच्या विजयावर म्हटले आहे की, हा जनादेश दर्शवितो की लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकास कार्यक्रमांवर विश्वास आहे. भाजपने 97 टक्के जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. भविष्यात पंचायत निवडणुकीत 100 टक्के जागा जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अमित शहा यांनीही अभिनंदन केले –
त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनीही त्रिपुरा भाजपचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल त्रिपुरातील जनतेचे मनापासून आभार मानतो. हा विजय त्यांचाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे विकासाभिमुख उपक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी मी मुख्यमंत्री माणिक साहा, प्रदेश भाजप अध्यक्ष राजीव भट्टाचार्य आणि आमच्या कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो.