प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -करोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 16 दिवसांत 80 हजार जणांनी डोस घेतला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी मोफत डोस दिला जात आहे. शहरात 15 जुलैपासून आतापर्यंत 18 ते 59 वयोगटात 79 हजार 968 जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. याआधी हा बुस्टर डोस खासगीमध्ये विकत घ्यावा लागत असल्याने तो घेण्याचे प्रमाण फार कमी होते.
याआधी म्हणजेच 15 जुलै आधी बूस्टर डोस हा हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांपुढील नागरिक वगळता तो इतरांना विकत घ्यावा लागत होता. तो खासगी रुग्णालयांत 385 रुपये भरून घ्यावा लागत होता. त्यामुळे त्याला प्रतिसाद नव्हता.
याआधी शहरात खासगी रुग्णालयांत 18 ते 59 वयोगटात दर दिवशी केवळ दीड ते दोन हजार लाभार्थी लस घेत असत. मात्र, आता ती संख्या दर दिवसाकाठी पाच ते सात हजारांवर गेली आहे. बूस्टर डोससाठी ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करता येते आहे. शहरातील 68 लसीकरण केंद्रांवर कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, सध्या डोसांची कमतरता असल्याने हे प्रमाण कमी झाले आहे. शहरात आतापर्यंत सर्व वयोगटातील 38 लाख 78 हजार नागरिकांनी पहिला डोस, तर 32 लाख 51 हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
दुसरा डोस घेऊन 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झालेल्या 18 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिनचा तिसरा डोस घेता येणार आहे. महापालिकेकडे कोव्हॅक्सिनचा तुटवडा आहे. मात्र तो लवकरच दूर होईल.
– डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका
18 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण
18 वर्षापुढील नागरिक42 लाख 10 हजार 592
पात्र लाभार्थी3 लाख 30 हजार 334
पहिला डोस37 लाख 78 हजार
दुसरा डोस32 लाख 51 हजार
तिसरा डोस4 लाख 55 हजार