कोलकाता: पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांनी 31 लाख रुपयांची रक्कम सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) जमा केली. ती रक्कम त्यांना चिट फंड घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या शारदा ग्रुप कंपनीकडून मिळाली होती.
संबंधित घोटाळ्याचा तपास ईडीबरोबरच सीबीआयकडून केला जात आहे. त्या यंत्रणांच्या रडारवर तृणमूलचे काही नेते आहेत. त्यापार्श्वभूमीवर, रॉय यांच्या कृतीला मोठे महत्त्व आहे. शारदा ग्रुपने रॉय यांना ब्रॅंड ऍम्बॅसेडर बनवले होते. त्यासाठी त्यांच्यात 49 लाख रुपयांचा करार झाला. मात्र, त्या कंपनीकडून 31 लाख रुपयेच मिळाल्याचा दावा रॉय यांनी केला. त्या रकमेचा बॅंक ड्राफ्ट त्यांनी ईडीकडे पाठवला. शारदा ग्रुपवर मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.