नवी दिल्ली – इस्रायलचे सॉफ्टवेअर पेगॅससच्या माध्यामातून केल्या गेलेल्या कथित हेरगिरीबाबत सरकारकडून संसदेत सादर केले जात असलेले निवेदन आज तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी हिसकावून घेतले आणि फाडून टाकले. विरोधकांनी पूर्वी केलेल्या गदारोळामुळे दोनवेळेला सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव राज्यसभेमध्ये निवेदन करत असताना तृणमूल कॉंग्रेस, कॉंग्रेसचे खासदार आणि अन्य विरोधी पक्ष नेते आक्रमक झाले. वैष्णव यांनी निवेदनाच्या काही ओळी वाचल्यानंतर गदारोळ वाढल्यावर त्यांनी निवेदन वाचणे थांबवले आणि या निवेदनाची प्रत सभागृहाच्या पटलावर सादर करत असल्याचे त्यांना सभागृहात सांगावे लागले.
विरोधक ज्या निवेदनाची मागणी करत होते, त्याविषयी चर्चा करण्याची विरोधकांचीच इच्छा नाही, असे उपाध्यक्षांनी सुनावले. मात्र तरिही विरोघकांची घोषणाबाजी आणि आरडाओरडा सुरूच राहिला. याच दरम्यान तृणमूल कॉंग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी वैष्णव यांच्या हातातील निवेदन हिसकावून घेतले आणि फाडून टाकले. या निवेदनाचे तुकडे सेन यांनी सभागृहामध्ये हवेत भिरकावले.
विरोधकांच्या वर्तनावर राज्यसभेतील उपाध्यक्ष संतप्त झाले आणि त्यांनी सदस्यांना संसदीय कामकाजादरम्यान गैरवर्तन न करण्याची ताकिद दिली. या सर्व घडामोडींनंतर उपाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
सभागृहातील सदस्यांनी गैरवर्तन करू नये असे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सर्व सदस्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी राज्यसभेच्या पटलावर निवेदन सर्व खासदारांना ऐकायचे होते. हे निवेदन मंत्र्यांनी सादर केले आहे आणि त्या निवेदनावर चर्चा केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
वैष्णव यांनी आज सादर केलेले निवेदन हे 19 जुलैला संसदेत सादर केलेलेच निवेदन होते. संभाव्य हेरगिरी झालेल्या व्यक्तींच्या नावांच्या यादीमध्ये वैष्णव यांचे स्वतःचेही नाव आहे. कथित हेरगिरीचे वृत्त भारतीय लोकशाहीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे, असे वैष्णव यांनी या निवेदनात म्हटले आहे.