कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे बशीरहाटचे खासदार हाजी नुरुल इस्लाम यांचे बुधवारी वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले. इस्लाम यकृताच्या कर्करोगाने त्रस्त होते आणि दुपारी १.४५ वाजता त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इस्लाम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपले एक अमूल्य सहकारी, बशीरहाटचे आमचे खासदार, हाजी नुरुल इस्लाम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करते असे त्यांनी म्हटले आहे.
इस्लाम पहिल्यांदा 2009 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर बशीरहाटमधून खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये त्यांनी जंगीपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. त्यानंतर, 2016 मध्ये त्यांनी बशीरहाट लोकसभा अंतर्गत हरोआ विधानसभा जागा जिंकली आणि विजय मिळवला.
2021 मध्ये त्यांनी पुन्हा हरोआमधून विधानसभेची निवडणूक जिंकली.2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने इस्लाम यांनी पुन्हा बशीरहाट लोकसभा जागा मिळविली. ही पश्चिम बंगालमधील सर्वात महत्त्वाची जागा होती. बंगालमध्ये 2010 मध्ये देगंगा दंगल भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.