तृणमूल खासदाराच्या सरकारी निवासस्थानातून 32 लाखांची रोकड जप्त

ईडीचे छापासत्र: मनी लॉण्डरिंग प्रकरणी रडारवर

नवी दिल्ली -तृणमूल कॉंग्रेसचे खासदार के.डी.सिंह यांच्याशी संबंधित काही ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरूवारी छापे टाकले. त्या कारवाईवेळी सिंह यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानातून 32 लाख रूपयांची रोकड आणि 10 हजार अमेरिकी डॉलर्स जप्त करण्यात आले.

राज्यसभा सदस्य असणारे सिंह मनी लॉण्डरिंगच्या आरोपावरून ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यातून कारवाईचे पाऊल उचलताना ईडीने दिल्ली, चंडीगढमधील सात ठिकाणी छापे टाकले. त्यात सिंह यांच्या अलकेमिस्ट समुहातील कंपन्यांच्या कार्यालयांचाही समावेश आहे.

छाप्यांवेळी काही व्यवहार आणि मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे तसेच डिजिटल स्वरूपाचे पुरावे हाती आल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली. सिंह यांच्या विरोधात मनी लॉण्डरिंगच्या आरोपावरून दोन गुन्हे दाखल आहेत. त्यावरून त्यांना मागील वर्षी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर असतानाच सिंह यांच्याशी संबंधित छापासत्र झाले. अर्थात, काही काळापासून सिंह तृणमूलपासून दुरावल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.