कोलकता – पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना बुधवारी रात्री त्या राज्यातील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांच्या निदर्शनांना सामोरे जावे लागले. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल गो बॅकच्या घोषणा दिल्या.
बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये दुखापत झालेल्या ममतांना उपचारासाठी कोलकत्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची विचारपूस करण्यासाठी धनखड पोहचले.
त्यावेळी रूग्णालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी धनखड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तृणमूल सरकार आणि धनखड यांच्यात सातत्याने विविध मुद्द्यांवरून संघर्ष होताना दिसला. त्यातूनच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी थेट राज्यपालांविरोधात घोषणा दिल्याचे मानले जात आहे.