त्र्यंबकेश्‍वर

‘गोदावरीतटी, एका ठायी नांदताती… ब्रह्मा, विष्णू, महेश शिवलिंगात शोभती…’

अशी ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वरची महती आहे. त्र्यंबक म्हणजे त्रिनेत्र महादेव. ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत हे शिव क्षेत्र वसले आहे. या ज्योतिर्लिंगात ब्रह्मा-विष्णू-महेश हे तिन्ही विराजमान आहेत. हे वैशिष्ट्य आहे. बाकी ज्योतिर्लिंगात फक्त भगवान शिव विराजमान आहेत. हे मंदिर सिंधू वास्तूशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे.

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा नदीच्या दरम्यान बारा नद्यांच्या उगमस्थळी बारा शिवमंदिरे बांधली. त्यातील हे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीत उभारले आहे. नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आता ते राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. निसर्गाच्या कुशीत हे मंदिर वसले आहे. या मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केले आहे. मंदिराच्या शिखरावर अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले आहे. मंदिराभोवती तटबंदी आहे.

गाभाऱ्यामधील शिवलिंगात ब्रम्हा, विष्णू आणि शिव या तीनही देवांची प्रतीक म्हणून छोटी तीन लिंगे आहेत. ती शिवलिंगाच्या खोलगट भागात वसलेली आहेत. शिवशंकराचे इथे त्रिंबक रूपात पूजन केले जाते. रत्नजडित सोन्याचे मुकुट शिवलिंगाला घालतात. येथील कुशावर्त तीर्थात गोदावरी नदीचा उगम होतो. बारा वर्षातून एकदा इथे कुंभमेळा भरतो. दक्षिणवाहिनी गोदावरी नदी आणि पूर्वाभिमुख पिंड असे वैशिष्ट्य असल्यामुळे याला श्रीक्षेत्र असे संबोधले जाते. गोदावरी नदीच्या काठी कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी, नारायण नागबली हे विधी करतात. महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशीला येथे मोठी यात्रा भरते.

– माधुरी शिवाजी विधाटे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.