पिंपरी, (प्रतिनिधी) – पादचाऱ्यांसाठी, सायकलप्रेमी तसेच लहान शाळकरी मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी सार्वजनिक परिसर हा स्वच्छ, सुंदर आणि उत्साहवर्धक बनवण्याच्या उद्देशाने हरित सेतू उपक्रम राबविण्यात येत आहे.
तसेच, स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकवावा. हरित सेतू उपक्रमात देखील आपला सहभाग नोंदवून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा मोहीम तसेच हरित सेतू उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी बुधवारी (दि. १४) सकाळी सहा वाजता आकुर्डी परिसरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी आयुक्त सिंह यांनी मार्गदर्शन केले. सायकलपटूंनी आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत “आम्ही शपथ घेतो की, आम्ही आपला तिरंगा ध्वज आमच्या घरांवर फडकवू तसेच स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनांचा सन्मान करू आणि भारताचा विकास व प्रगतीसाठी आम्ही स्वत:ला समर्पित करू” अशी शपथ घेतली.
पालिकेच्या वतीने तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा स्वाक्षरी मोहीम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल रॅलीचा प्रारंभ शहरातील जेष्ठ नागरिक रवींद्र होनराव यांनी झेंडा दाखवल्यानंतर सकाळी सहा वाजता आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर सभागृह येथून झाला. ही रॅली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोरून संजय काळे ग्रेड सेपरेटर – नॅशनल सुपर मार्केट, म्हाळसाकांत चौक,
लोकमान्य हॉस्पिटल, फ क्षेत्रीय कार्यालय, काचगर चौक, भेळ चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, हुतात्मा चौक, अप्पूघर चौक, धर्मराज उड्डाणपूल, आकुर्डी रेल्वे स्टेशन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय या मार्गाने मार्गस्थ होऊन पुन्हा गदिमा सभागृह येथे येऊन रॅलीचा समारोप झाला.
घरोघरी तिरंगा मोहीमेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या भव्य सायकल रॅलीवेळी माझी वसुंधरा ही पर्यावरण रक्षणाची सामुहिक शपथही घेण्यात आली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक यांनी केले.
सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच इंडो ॲथलेस्टिक्स सोसायटी (आयएएस)चे गजानन खैरे आणि त्यांच्या संस्थेचे संपूर्ण सहकार्य रॅलीला लाभले. त्यामुळे सायकल फेरी सुरक्षितपणे यशस्वी झाली. रॅलीत सुमारे ५५३ सायकलपटूंनी सहभाग नोंदवला.