– सूर्यकांत पाठक
ग्राहक चळवळ, ग्राहक पंचायतपर्यंत सतत आमच्याबरोबर असलेला एक दुवा नुकताच निखळला. स्वत: केलेल्या कामातून नावारूपाला येऊन लोकांच्या मनात जागा मिळवणारे कार्यकर्ते आजकाल फारच दुर्मिळ होत चालले आहेत. अशा कार्यकर्त्यांपैकीच एक म्हणजे भाऊसाहेब तथा ठकसेन पोरे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर गेल्या चार दशकांहून अधिक काळातील अनेक आठवणी मनात दाटून आल्या. त्यांच्यासारखा सर्वार्थाने नि:स्पृह कार्यकर्ता आज सहजासहजी सापडणार नाही, तो शोधावाच लागेल. ग्राहक चळवळीत काम करताना मीच त्यांना भाऊसाहेब पोरे असे नाव दिले आणि आज त्यांना देशभरातील कार्यकर्ते याच नावाने ओळखतात.
त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच. घराला हातभार म्हणून विद्यार्थी दशेपासूनच नोकरी. पुण्यात ग्राहक चळवळीचे वारे वाहू लागले. या चळवळीचे प्रणेते बिंदूमाधव जोशी. ग्राहक चळवळीला पुढे नेणारे माध्यम होते ते ग्राहक संघ. ग्राहक संघाच्या माध्यामातून ग्राहक चळवळ पुढे जात होती. ग्राहक चळवळीला लोकांचे पाठबळ मिळत गेल्याने चळवळीचे रूपांतर ग्राहक पंचायतीत झाले.
त्यावेळी भाऊसाहेब रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. रिक्षा व्यवसाय आणि ग्राहक पंचायतीचे सक्रिय कार्यकर्ते या दोन्हीतून भाऊसाहेबांच्या ओळखी वाढू लागल्या. ग्राहक पंचायतीची आंदोलने, सभा, वस्तू वितरण अशा विविध उपक्रमातील त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्याच वेळी भाऊसाहेबांनी रिक्षा चालकांच्या आरटीओमध्ये असलेल्या अडचणी सोडवण्यास सुरुवात केली. स्वत: रिक्षाचालक असूनही आपल्या व्यवसायातील उणिवांवरही ते बोट ठेवत.
रिक्षांसाठी जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचा विषय सुरू झाला त्यावेळी प्रचलित मीटरमधील अनेक उणिवा भाऊसाहेबांनीच निदर्शनास आणून दिल्या. पुढे त्यांना पुणे ऑटो रिक्षा सोसायटीच्या सचिवपदी नेमण्यात आले. त्यांच्या अथक परिश्रमातून “ऍटो रिक्षा सोसायटी’ नावारूपाला आली आहे. अनेक रिक्षाचालकांना ग्रिसिंग, पियूसी इ. गोष्टी सवलतीच्या दरात उपलब्ध झाल्या.
ग्राहक पंचायतीचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यापासून ते शेवटी आवराआवर करण्यापर्यंत भाऊसाहेब त्यात आनंदाने सहभागी होत असत. ते कवीमनाचे होते. त्यांना सूत्रसंचलनाची आवड होती. त्यामुळे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, गीत गायन हे त्यांचे विशेष आवडीचे.
ग्राहक पंचायतीच्या कामातून उभ्या राहिलेल्या ग्राहक पेठ को. ऑप. डिपार्टमेंटल स्टोअरचेही ते 10 वर्षे संचालक म्हणून सक्रिय कार्यरत होते. हाडाचे कार्यकर्ते असलेले भाऊसाहेब पोरे हे त्यांच्या मुद्द्यांशी ठाम असायचे. त्यांनी एकीकडे संसार दुसरीकडे चळवळ, सामाजिक काम अशा दोन आघाड्यांवर कायमच लढत राहिले. भावपूर्ण श्रद्धांजली!