काही दिवसांपूर्वी मुंबईतील वीज पुरवठा काही तासांसाठी खंडित झालेला आठवतयं का? अवघ्या काही तासांसाठी वीज पुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन उपयोगाच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम झाला. मात्र हेच जर संपूर्ण जगात घडले तर? डिसेंबर 2029 साली असेच काहीसे युरोपमध्ये घडते व सर्व प्रचलित व्यवस्था मोडकळतात. जर्मन सीरिज ‘ट्राइब्स ऑफ युरोपाची’ (Tribes of Europa) सुरुवात होते 2074 सालापासून. डिसेंबर 2029 म्हणजेच ‘ब्लॅक डिसेंबर’च्या घटनेपासून जवळपास 50 वर्षांनी.
ब्लॅक डिसेंबरच्या घटनेने युरोपमधील राष्ट्र पद्धत पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. वीज पुरवठा, तंत्रज्ञान, मोबाईल, गॅजेट सर्वकाही नष्ट झालेले आहे. राष्ट्र पद्धत, लोकशाही हे सर्व समाप्त झाल्याने युरोपमध्ये शेकडो, हजारो जमाती (ट्राइब्स) निर्माण झाल्या आहेत. स्वतःच्या बचावासाठी, वेगळेपणा जपण्यासाठी या जमाती लपून राहत असतात. यातीलच एक जमात आहे ‘ओरिजिनिस’. आतापर्यंत लपून-छपून राहणाऱ्या या ओरिजिनिसच्या भागात ‘अटलांटियन’ जमातीचे आधुनिक विमान येऊन कोसळते व येथून पुढे खरा संघर्ष सुरू होतो. (Tribes of Europa)
नेटफ्लिक्सवरील जर्मन सीरिज ‘डार्क’ला जगभरातील प्रेक्षकांनी दाद दिली. डार्कचेच प्रोड्यूसर असलेल्या मॅक्स विइडमन आणि क्विरिन बर्ग यांनी आणलेली आणि फिलिप कॉक दिग्दर्शित ट्राइब्स ऑफ युरोपा मात्र अपेक्षांवर फारशी खरी उतरत नाही. ब्रेक्झिटच्या धरतीवर ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला असला तरीही पोस्ट अपाक्लिपिटिक अर्थात सर्वनाशानंतरचे जग या थीमवर अनेक सीरिज, चित्रपट येऊन गेले आहेत. त्यामुळे ट्राईब्स ऑफ युरोपामध्ये फारसे काही नाविन्य वाटत नाही.
ट्राईब्स ऑफ युरोपाची (Tribes of Europa) गोष्ट ओरिजिनिस जमातीच्या एलिया (डेव्हिड अली रशीद), किआनो (एमिलिओ सकाराया) आणि लिव्ह (हेन्रिएट कन्फुरियस) या तीन भावडांच्या अवतीभवती फिरत राहते. जंगलात शिकार करण्यासाठी गेलेल्या या तीन भावडांसमोर अचानक अटलांटियनचे आधुनिक विमान कोसळते. पुढे या विमानाचा पायलट आणि त्यासोबतच एक क्यूब खास या भावडांना सापडतो.
पायलट मृत्यूआधी क्यूब एलियाकडे देत त्याच्यावर मिशन सोपवतो. याचवेळी पायलट आणि क्यूबच्या मागावर असलेली ‘क्राउस’ नावाची हिंसक जमात ओरिजिनिसवर हल्ला करत त्यांची हत्या करते. या हल्ल्यातून ही तीन भावडं कशीतरी वाचतात. त्यातील एलिया क्यूब घेऊन पळून जातो, किआनोला क्राउस गुलाम म्हणून कैद करतात, तर मृत अवस्थेत पडलेल्या लिव्हला ‘क्रिमसन’ नावाची मिलिट्री असलेली जमात वाचवते.
सुरुवातीच्या दोन भागात सीरिज प्रेक्षकांना काहीप्रमाणात खिळवून ठेवते. परंतु, नंतर प्रत्येक मिनिटाला सेक्स आणि हिंसेचा भडीमार नकोसा वाटू लागतो. एकीकडे, ब्लॅक डिसेंबर घडण्यामागे कारण काय आणि त्या क्यूबमध्ये नक्की काय आहे ? क्यूब इतर जमातींसाठी का महत्त्वाचे आहे ?
ही उत्तरे मिळविण्यासाठी आणि पायलटला दिलेला शब्द पाळत क्यूब विशिष्ट ठिकाणी पोहचविण्यासाठी मिशनवर निघालेला एलिया. त्याच्या मार्गात येणारे अडथळे, भेटणारी लोकं आणि दुसरीकडे क्राउसच्या गुलामीतून सुटण्यासाठी किआनोचा संघर्ष आणि क्रिमसनच्या मिलिट्रीचा वापर करून क्राउसच्या तावडीतून किआनोला सोडवण्याचा लिव्हचा प्रयत्न ट्राइब्स ऑफ युरोपामध्ये (Tribes of Europa) पाहायला मिळतो.
सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. त्यातल्या त्यात एलियाला प्रवासात मदत करणारे मोसेस (ऑलिव्हर मासुची) आणि किआनोला गुलाम बनणारी क्राउसच्या नेत्यांपैकी एक असलेली लॉर्ड वरवरा (मलिका फोरुटन) ही पात्र छापून सोडून जातात.
ट्राइब्स ऑफ युरोपा बघताना सातत्याने यापूर्वी आलेले पोस्ट अपाक्लिपिटिक प्रकारातील ‘द 100, द रेन’, ‘हंगर गेम्स’ अशा तरुणाईच्या प्रमूख भूमिका असलेल्या सीरिज आठवतात. या सर्वांमध्ये युरोपा स्वतःचा वेगळेपणा वठविण्यात फारशी यशस्वी होत नाही.
युरोपाचा कालखंड 2074 मधील दाखवलेला असला तरी कॉस्ट्यूम मात्र अगदी थोड्या फार फरकाने सध्याच्या काळातीलच वाटतात. व्हीएफएक्स देखील फारशी छाप सोडत नाही. केवळ सहाच भागांमध्ये पहिला सीझन संपवल्याने दिग्दर्शकाने पुढील सीझनसाठी विनाकारणच काहीतरी राखून ठेवल्यासारखे वाटते. सीरिज संपवताना दिग्दर्शकाने अतिघाई केल्याने अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. त्यामुळे या प्रश्नांच्या उत्तरांसाठी पुढील सीझनपर्यंत वाट पाहावी लागेल.
सीरिज – ट्राइब्स ऑफ युरोपा
दिग्दर्शक – फिलिप कॉक, फ्लोरिन बॅक्समायर
कलाकार – डेव्हिड अली रशीद, एमिलिओ सकाराया, हेन्रिएट कन्फुरियस, ऑलिव्हर मासुची, मलिका फोरुटन
स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म – नेटफ्लिक्स
– आकाश उभे