#INDvNZ : कोहलीचा ‘विकपॉइंट’ बोल्टने शोधला

ख्राइस्टचर्च – न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने भारतीय कर्णधार विराट कोहली याचा विकपॉइंट शोधल्याचे उघड केले आहे. टी-20 मालिकेत पराभूत झालेल्या न्यूझीलंडने एकदिवसीय तसेच कसोटी मालिका जिंकताना भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. कोहलीला या दोन्ही मालिकेत दर्जाला साजेशी कामगिरी करता आली नाही, याचेच रहस्य बोल्टने उघड केले. 

कोहली हा महान फलंदाज आहे यात शंका नाही. मात्र तो देखील दडपणाखाली येऊ शकतो व आततायी फटका मारून बाद होऊ शकतो हे आम्ही दाखवून दिले. संघाची परिस्थिती बिकट असताना कोहली त्याच्या एकट्याच्या जोरावर सामन्याला कलाटणी देऊ शकतो, मात्र, त्याचवेळी त्याच्यावर दबाव आणला तर तो चुकीचा फटका मारून बादही होऊ शकतो हे आम्ही सिद्ध केले आहे, असे बोल्टने स्पष्ट केले.

स्विंग गोलंदाजी ही भारतीय फलंदाजांची प्रसिद्ध डोकेदुखी आहे. या मालिकेत कोहली एकही मोठी खेळी करू शकला नाही. दोन्ही कसोटी सामन्यांत त्याला अपयश आले. त्याचे बाद होणेच संघासाठी नुकसानकारक ठरले व आमची सरशी झाली. तो फलंदाजी करत असताना त्याच्या चौकार व षटकारांवर आम्ही बंधन आणले तसेच चपळ क्षेत्ररक्षणामुळे त्याला एकेरी व दुहेरी धावा काढणेही मुश्‍किल बनले म्हणूनच तो दबावात आला व आततायी फटका मारून बाद होत गेला. दबावाखाली तोदेखील बाद होऊ शकतो हेच यातून दिसून आले, असेही बोल्टने सांगितले.

कोहलीला दोन कसोटीच्या चार डावात केवळ 38 धावाच करता आल्या. कारकिर्दीत 50 पेक्षा जास्त सरासरी असलेल्या कोहलीने या मालिकेत 9.50 च्या सरासरीने धावा केल्या.
कोहली त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा इतका अपयशी ठरला आहे. 2014 मध्ये ऑक्‍टोबरपर्यंत त्याने खेळलेल्या 25 डावात त्याला एकही शतक फटकावता आले नव्हते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.