ट्रेंड डिझायनर पडद्यांचा

गृहसजावटीत पडद्यांना बरेच महत्त्व आहे. कारण पडद्यांमुळे घराचे सौंदर्य फुलते. घराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पडदे महत्त्वाची भूमिका बजावतात. हल्ली प्रिंटेड पडद्यासोबत गोफ आणि मोत्यांचे पडदेही बाजारात उपलब्ध आहेत. पडद्यांसाठी प्रिंटेड किंवा प्लेन कापडही मिळते. त्यापासून आपल्या आवडत्या डिझाईनमध्ये आपण पडदे शिवून घेऊ शकतो.

पडदे शिवण्याच्या अनेक डिझाईन्सचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. आपले बजेट लक्षात घेऊन आवडीनुसार डिझाईन निवडावे. वेलवेट, पॉलिएस्टर, क्रश, कॉटन-सिंथेटिक, अशा प्रकारच्या मिक्‍स मटेरियलमध्येदेखील पडदे उपलब्ध आहेत. दोन वेगवेगळ्या प्लेन आणि डिझाईनच्या कापडाला चौकोनी तुकड्यात कापून आणि त्यांची आकर्षक मांडणी करून, शिवून, वेगळ्या पद्धतीने पडदे आपण बनवून घेऊ शकतो. अर्थात, बाजारात तयार पडदेही उपलब्ध असतात. त्यांचाही वापर आपण करू शकतो. काहींना घरात धूळ येऊ नये म्हणून पडदे हवे असतात तर काहींना जास्त ऊन नको म्हणून हवे असतात. आपली गरज ओळखून पडद्यांची निवड करावी. केवळ सजावटीसाठीही पडद्यांची निवड करता येते. सध्या मोत्यांच्या पडद्यांची चलती अधिक दिसून येते. अतिशय सुंदर, रंगिबेरंगी माळांचा यामध्ये वापर केलेला असतो. या पडद्यांची किंमत सर्वसाधारणपणे 550 ते 750 रुपयांपर्यंत असते. कॉटन, सिंथेटिक अशा मिक्‍स कापडाचे मटेरियल 60 ते 250 मीटर या दराने मिळते. यामध्ये सुंदर फुलांच्या प्रिंट आणि लायनिंगचे पडदेही मिळतात. हे पडदे टिकावू असल्यामुळे मध्यमवर्गीयांची पहिली पसंती ठरतात.

घराच्या शाही लूकसाठी वेलवेटचे पडदे फार सुरेख दिसतात. हे पडदे अतिशय मऊ असून प्रिंटेड आणि प्लेन अशा दोन्ही स्वरूपात मिळतात. वेलवेटचे कापड फार महाग असते. 225 रुपये मीटर या किमतीपासून हे कापड मिळते. पडद्यांचा आणखी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे पॉलिस्टर क्रश मटेरियल. यामध्ये प्लेन रंगांचे पडदे दिसून येतात. हे कापड पातळ आणि सुळसुळीत असते. दोन वेगवेगळ्या रंगांचा वापर करून या पडद्यांनी घर सजवता येते. शिवाय याची किमतही जास्त नसते. विस्कोमगोप कर्टन हादेखील पडद्याचा एक प्रकार आहे. विशिष्ट दोऱ्यापासून हा पडद तयार केला जात असून ते फारच आकर्षक असतात. शोभेसाठी आपण या पडद्याचा नक्‍कीच वापर करून घेऊ शकतो. सध्या उन्ह्याची चाहूल लागत आहे अशा वेळी कॉटनचे पडदे सर्वात चांगला उपाय ठरतो. मात्र घरात जास्त ऊन येत असल्यास असे पडदे लवकर खराब होण्याची शक्‍यता असते.

– विजयालक्ष्मी साळवी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)