ट्रेण्ड इज युअर फ्रेंड (भाग-2)

ट्रेण्ड इज युअर फ्रेंड (भाग-1)

बाजारातील नियामकांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही संवेदनशील माहिती ही हळूहळू बाजारामध्ये फुटतेच. सर्वप्रथम, ती फक्त अगदी आतील गोटापर्यंत मर्यादित असते, मग त्या गोटातील खास लोकांच्या जवळील मंडळीपर्यंत, नंतर विश्‍लेषक आणि मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत आणि शेवटी सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असते. या प्रसारणात कांही मिनिटांपासून ते दिवसांपर्यंत वेळ लागतो. अनेक वेळा अशा बातम्या बाजारात येईपर्यंत त्यासंबंधीत कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत हालचाल होऊन गेलेली असते. उदा. एखाद्या कंपनीच्या बाबतीतील विशेष घटना अथवा आगामी काळात जाहीर होणारे निर्णय हे त्या कंपनीच्या मालकांव्यतिरिक्त संचालक मंडळास, प्रवक्त्यांस नक्कीच माहिती असतात.

जर ती माहिती कंपनीसाठी सकारात्मक असेल तर अशा व्यक्तींकडून किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून अशा कंपनीच्या शेअर्सची जोमानं खरेदी होते. नंतर जसजशी ही माहिती हळूहळू बाहेर येते तसतशी वर दिल्याप्रमाणे इतरांकडूनही खरेदी होऊ शकते. आता समजा अशा घडामोडींच्या आधी एखाद्या कंपनीचा भाव रु. 100 असेल तर सर्वप्रथम आतल्या गोटातील मंडळी म्हणजे कंपनीचे मालक, संचालक, प्रवर्तक, त्यांचे नातेवाईक, इ. लोक अचानक या कंपनीच्या शेअर्सच्या भावांवर तुटून पडतात व पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यानं हे भाव 101-102-103 – 110 पर्यंत देखील वाढतात. तोपर्यंत, नंतरच्या गटातील लोकांना याची जाणीव होते व ते भाव खाली यायची वाट न पाहता 110 च्या भावात उडया मारतात व भाव 114-115 पर्यंत घेऊन जातात.

आता पहिल्या गोटातील किरकोळ असलेल्यांना साधारणपणे 14-15 %नफा मिळत असल्यानं त्यातील कांही नफावसुली करतात व भाव पुन्हा 107-110 पर्यंत खाली येतात. परंतु ते तेजीच्या सुरुवातीच्या पायथ्याशी कधीच येत नाहीत याचं कारण म्हणजे ज्यांची सुरुवातीस खरेदी राहून गेलेली असते ते लोक या वाढून पडलेल्या भावात संधी साधतात व भाव पुन्हा 115 पर्यंत पोहोचतात. त्यामुळं कल-दिशेसाठी आता 100 – 107 – 110 – 115 असे उच्चांक स्थापन झालेले दिसतात आणि यालाच आलेखावर ट्रेंड म्हटलं जातं.उदाहरणच द्यायचं झालं तर रिलायन्स इंडस्ट्रीजचं देता येईल.

22 फेब्रुवारी 2017 रोजी रिलायन्सनं जियो बद्दलची घोषणा केली आणि रिलायन्सच्या शेअरचा भाव त्याच दिवशीसुमारे 11 टक्क्यांनी वाढून मागील आठ वर्षांतील उच्चांकाजवळ पोहोचला. परंतु बारकाईनं पाहिल्यास आता लक्षात येईल की याची मुहूर्तमेढ नोव्हेंबर 2016 पासूनच झालेली दिसते. रिलायन्सचा भाव रु. 465 वरून हळूहळू रु.548 झाला पुन्हा 507 रुपयांपर्यंत खाली येऊन, 21 फेब्रुवारी म्हणजे अधिकृत घोषणेच्या आदल्या दिवशी पुन्हा 545 रु.झाला व 22 फेब्रुवारीचा त्याचा बंद भाव होता 603 रुपये. अगदी याच्या उलट बाब कंपनीमध्ये एखादी खराब बातमी असल्यास किंवा कंपनीस हानीकारक बाबी असल्यास घडू शकते. उदा. डीएचएफएल. कंपनीबाबतची नकारात्मक बातमी फुटली 21 सप्टेंबर 2018 ला, परंतु ह्या शेअर्सचा भाव 3 सप्टेंबर 2018 पासूनच हळूहळू खाली खाली येऊ लागला होता. 3 सप्टेंबरचा उच्चांक होता, रु. 691.5 तर 19 सप्टेंबरच्या म्हणजे आदल्या दिवशीचा भाव होता 610 रु. म्हणजे केवळ 11 सत्रांतच भाव तब्बल 12 टक्क्‌यांच्या आसपास पडला होता. तर अशा गोष्टी एका विशिष्ट पद्धतीनं चार्टवर नमूद होतात, गरज असते ती फक्त कल ओळखण्याची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)