पुणे/फुरसुंगी – हवेली तालुक्यातील वडकीगावच्या हद्दीत कानिफनाथ डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या निदर्शनास आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गाव परिसरात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून रात्रीच्यावेळी बिबट्या दिसत आहे.
कानिफनाथ डोंगरावर दररोज शेकडो नागरिक ट्रेकिंगसाठी येत असल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. वडकीनाला भागातून कानिफनाथ मंदिराकडे जाणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी गेल्या काही दिवसांपासुन बिबट्याचा वावर वाढला आहे. रहिवासी परिसरात बिबट्याचा वावर अचानक वाढल्याने स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.
गावातील स्थानिक रहिवासी फडतरे यांच्या घराजवळ तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्या येऊन बसत आहे. या बिबट्याने अद्याप तरी कोणावर हल्ला केलेला नाही.
वनरक्षक राहूल रासकर यांनी बिबट्याच्या पायाचे ठसे व त्याचा वावर या बद्दल स्थानिक नागरिकांशी चर्चा केली असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे रासकर यांनी सांगितले.
वडकीचे उपसरपंच दिलीप गायकवाड म्हणाले की, या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे. कानिफनाथ डोंगरात पहाटे तीन ते चार वाजल्यापासुनच ट्रेकिंग व व्यायामाला जाणाऱ्या शेकडो नागरिकांची वर्दळ असते. बिबट्याला पकडेपर्यंत तरी नागरिकांनी ट्रेकींगला येऊ नये, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.