मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्‍यक : सयाजी शिंदे

पुणे – वृक्ष म्हणजे तपश्‍चर्येला बसलेले ऋषी मुनी आहेत. त्यामुळे या सृष्टीवर वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. आयुष्याच्या शेवटी मानवाला शांती हवी असते आणि ही शांती निसर्गाच्या सान्निध्यातच मिळते, असे मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्‍त केले.

सातारा येथील सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे लेखक सयाजी शिंदे लिखित “तुंबारा’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, चित्रकार प्रभाकर कोलते, कादंबरीकार रंगनाथ पठारे, कवयित्री व प्रकाशक सुमती लांडे आदी उपस्थित होते.

निसर्गाचे सौंदर्य उलगडण्यासाठी येत्या 13 व 14 फेब्रुवारी रोजी बीड येथे जगातील पहिले वृक्षसंमेलनाचे आयोजन केले आहे. यावेळी “वृक्षसुंदरी’ ही संकल्पनासुद्धा राबविली जाणार आहे, असे सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.

संत ज्ञानेश्‍वर यांनी 730 वर्षांपूर्वी वृक्षसंवर्धन या विषयावर भाष्य केले होते. मानवाचे निसर्गाशी अतूट नाते आहे. सयाजी शिंदे हे वृक्षारोपण व संवर्धन क्षेत्रात जे कार्य करीत आहेत ते उल्लेखनीय आहे. ध्यास असल्याशिवाय असे कार्य घडत नाही. त्यांच्या कार्यातून वैश्‍विक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते, असे प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी सांगितले.

याप्रसंगी वृक्षसंवर्धनासाठी कार्य करणारे श्रीकांत इंगळहाळीकर, रघुनाथ ढोले, डॉ. गारूडकर, प्रदीप वाल्हेकर, डॉ. मंदार दातार आणि वसुंधरा हिल्स ग्रुप, इकॉलॉजिकल सोसायटी, अविरत श्रमदान, रोजलॅंड रेसिडेन्सी सोसायटी आणि ग्रीन हिल्स ग्रुप यांचा विशेष सत्कार सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाला. अभिनेत्री वीणा जामकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.