जामखेडला देखभाली अभावी झाडे गेली जळून

तालुक्‍यात कोट्यवधी रुपये खर्च करूनही वृक्षलागवडीत अपयश; केवळ खड्डेच राहताहेत शेष

जामखेड -‘वृृृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संत वचनानुसार वृक्षाचे महत्त्व हजारो वर्षांपासून सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वृक्ष लागवड व संगोपनासाठी शतकोटी वक्षलागवड योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू केली. मात्र, ही योजना जामखेड तालुक्‍यात ‘पुढे पाठ, मागचे सपाट’ अशा परिस्थितीत दिसून येत आहे.

संख्येपेक्षा देखभाल हवी
वन विभाग व अन्य यंत्रणा केवळ वृक्ष लागवड करून, त्याचे जीओ टॅगिंग करून केवळ लावलेली रोपे रेकॉर्डवर आणत संख्या वाढवण्याचे काम करत आहे. मात्र, देखभाल व जोपासण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात लाखांच्या संख्येने झाडे लावले जातात. अन्य जिल्ह्याच्या स्पर्धेत आकडा मोठा दिसतो. आता मात्र, शेकडोंच्या संख्येत झाडे लावून तेवढीच जगवणे आवश्‍यक आहे. यामुळे खऱ्या अर्थाने या योजनेतून फायदा होईल.

गत चार वर्षापासून शतकोटी वृृृृक्ष लागवड योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, वृृृृक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढण्यापेक्षा ती कमी होत आहे. तापमानाचा कहरही वाढतच आहे. जामखेडमध्ये सामाजिक वनीकरण, वनविभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी विभाग, ग्रामपंचायत अशा शासनाच्या अनेक विभागांकडून वृक्षलागवडीची योजना राबविण्यात येते. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी खर्च केला जातो.

मात्र झाडांच्या संगोपन कोणीच करताना दिसत नाही. ही योजना अजूनही लोकचळवळ होऊ शकली नाही. यातील उणिवा दूर करण्याचे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. पाचव्या वर्षीही या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग, कृषी विभागांकडून वृृृृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे कामे सुरू आहे.

काही ठिकाणी कामे पूर्णही झाले आहेत. पंरतु, त्याच त्या खड्ड्यांमध्ये वृृृक्ष लावण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षात लावलेल्या खड्ड्यांतील झाडे देखभालीअभावी जळून गेली. याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे त्या जुन्या खड्ड्यांत नवीन वर्षाच्या व नवीन योजनेतून वृक्ष लागवड होणार आहे.

वृृृक्षलागवड केल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही योजना म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी, असाच प्रकार होत आहे. गेल्या चार वर्षात वृृृृक्ष लागवडीचा आढावा घेतल्यास, यातील खरी वस्तुस्थिती समोर येईल. चार वर्षात किती खड्डे खोदले व किती वृृक्ष लागवड झाली, त्यातील किती वृृृृक्ष आज जगली, याचे उत्तर कोणाकडेच नाही. मात्र, यातील सर्व खड्डे दिसून येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.