सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वृक्षतोड

सातारा – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. मात्र ही वृक्षतोड ज्या कार्यक्षेत्रात सुरू आहे त्या ठिकाणी काम करणारे वनपाल व वनरक्षक यांना या प्रकाराची कोणतीही कल्पना नाही. संबंधित वनपाल आणि वनरक्षक हे साताऱ्यात राहत असल्याने त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. जंगलाचे रक्षण करण्यासाठी ज्यांची नेमणूक केली असते तेच महाशय सातारा शहरात जर का राहत असतील तर अभयारण्याचे रक्षण नक्की करायचे तरी कोणी? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोयना धरण शिवसागर जलाशयालगत वसलेले वाघळी (ता. जावली) या गावच्या पुढील बाजूस विनायकनगरच्या दिशेने बेसुमार वृक्षतोड झाली. यात आईन, शिरस, तेलोस, चांदाडा, आढळ या जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. कत्तल करण्यात आलेल्या झाडांचा प्रामुख्याने घराच्या बांधकामासाठी वापर करतात.

वृक्ष तोड करण्यासाठी बामणोली वन्यजीव कार्यालयाकडून परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र बामणोलीचे प्रभारी वनक्षेत्रपाल साळुंखे यांना याविषयी विचारले असता अशी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत असेल तर कोअर क्षेत्रात काय काय घडत असेल? संबंधित बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या वर वन्यजीव विभाग यांचेकडून काय कार्यवाही होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी आणि पश्‍चिम घाटातील संवेदनशील भागात येतो. वाघळी ते सिंदवणे व्हाया चतुर बेट या त्रिकोणी टप्प्यात वनांची घनता जास्त आहे. याच भागाच्या आठ चौरस किलोमीटर क्षेत्रात वनविभागाला चकवून बेहेडा नागवेल खैर या झाडांची बेफाम कत्तल सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल सव्वाचार हजार झाडांची तोड झाल्याचे निरीक्षण पर्यावरण प्रेमींनी नोंदवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.