वृक्ष “लागवडी’ची होणार चौकशी; अजित पवारांचा दणका

मुंबई – राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेचे विधिमंडळाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. 31 मार्चपर्यंत समिती स्थापन होऊन त्यांना सुरुवातीला चार महिन्यांची मुदत देण्यात येईल त्यात आवश्‍यकता वाटल्यास दोन महिन्यांची मुदत वाढ देऊन या प्रकरणी सहा महिन्यात सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. आता फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात येणार, अशी घोषणा करत अजित पवार यांनी जोरदार दणका दिला आहे.
विधानसभा सदस्य रमेश कोरगावकर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबविण्याकरीता सन 2016-17 ते 2019-20 या कालावधीत वन विभागाला 2 हजार 429.78 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तो पूर्णपणे वापरण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत वन विभागाकडून 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्‍टोबर 2020 अखेर त्यातील 75.63 टक्के रोपे जिवंत असून त्यांची देखभाल करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत लागवड झालेले वृक्ष जगले पाहिजेत त्या खर्चासाठी शासन कुठल्याही निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही भरणे यांनी सांगितले.

या प्रकरणाची विधिमंडळाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी “या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तर दिले आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर मंत्र्यांचा विश्वास नाही का? आम्हाला चौकशीची अडचण नाही, पण तुमचा तुमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?’ असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला.

सभागृहाचं उत्तरावर समाधान नसेल तर विधीमंडळाची चौकशी समिती नेमली जात असते. हा तर तुमचा ड्रीम प्रोजेक्‍ट होता, फडणवीस तुमचा होता की मुनगंटीवारांचा? मग समिती नेमण्यात येणार याची मिरची का लागली?, असा पलटवार नाना पटोले यांनी केला.

त्यावर अजित पवार यांनी फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी होणार आहे. पुढील सहा महिन्यात चौकशी अहवाल तयार होणार असून तो सादर केला जाईल, अशी घोषणा केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.