लोणावळा -लोणावळा नगरपरिषदेच्या वृक्षारोपण संकल्प कार्यक्रमाची सुरुवात मंगळवारी (दि. 23) ज्येष्ठ कवी लेखक माजी खासदार जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री, माजी खासदार शबाना आझमी यांच्या हस्ते करण्यात आली. या वृक्षारोपण संकल्प कार्यक्रमांतर्गत यावर्षी नगरपरिषद हद्दीमध्ये 5 हजार झाडे लावण्याचा संकल्प निश्चित करण्यात आला आहे.
मंगळवारी लोणावळा शहरातील सहारा पूल याठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी अभिनेत्री तन्वी आझमी, राजन निगम, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर लोणावळा नगरपरिषदेच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात वरील मान्यवरांना स्वच्छ सर्वेक्षण दरम्यान नगरपरिषदेच्या कामाची माहिती देण्यात आली.
या वेळी बोलताना माजी खासदार जावेद अख्तर यांनी भारताच्या ज्या भागात आपण राहतो, त्या भागावर जर प्रेम नाही करू शकलो तर आपण आपल्या देशावर कसं प्रेम करू शकतो, असे प्रतिपादन करून सर्वप्रथम आपण जेथे रहातो त्या भागावर प्रेम करायला शिका, त्या भागाच्या विकासाच्या कार्यात सहभागी व्हा, आपोआप आपल्या देशाचा विकास होईल, उत्कर्ष होईल, असे सांगितले. तर शबाना आझमी यांनी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे कौतुक केले.