शेत बांधावरील वृक्ष लागवड योजना राज्यात राबविणार

पुणे – गोंदीया जिल्ह्यात यशस्वी ठरलेली शेत बांधावरील वृक्ष लागवड योजना आता राज्यात सर्वत्र राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याकरिता राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

अभिमन्यू काळे हे गोंदियाचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी 2017-18 साली शेताच्या बांधावरील वृक्ष लागवड योजना राबविली. त्याकरिता शेतकऱ्यांना अनुदानदेखील देण्यात आले होते. या योजनेला शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद लाभला. या योजनेंतर्गत स्थानिक वृक्षांची लागवड करण्यावर भर दिला गेला. वृक्षसंवर्धनामुळे जमिनीची धूप थांबून, पाला-पाचोळ्यापासून सेंद्रिय खत उपलब्ध झाले. याशिवाय या वृक्षांपासून फळे व फुलेदेखील शेतकऱ्यांना मिळू लागली.

या सर्व बाबी लक्षात घेता राज्यात ही योजना कशाप्रकारे राबविली जाऊ शकते, याचा अभ्यास करण्यासाठी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून या योजनेसाठी शासनावर किती आर्थिक भार पडणार आहे. त्याकरिता संभाव्य स्त्रोत कोणते असू शकतात. याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांना स्कॉलरशीप देता येईल का? शेत बांधावरील वृक्षांचे फायदे अभ्यासनासाठी शेती अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याबाबतचे विषय हाताळले जाणार आहेत.

या समितीमध्ये अभिमन्यू काळे यांच्याबरोबरच वनसंरक्षक अशोक गिरीपुजे, उपवनसंरक्षक जयरामे गौडा, अरविंद मुंडे, एस. युवराज, कृषी संशोक प्रताप चिपळूकर, यांच्याबरोबरच डॉ. दीपक आपटे व हिवरे बाजारचे पोपटराव पवार या दोन निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.