वृक्षतोड कापणी परवानगी ऑनलाइन

अर्जाच्या फेऱ्यातून नागरिकांची सुटका : प्रजासत्ताक दिनापासून मिळणार सेवा

पुणे – धोकादायक तसेच घराला अडचण ठरणाऱ्या वृक्षांच्या छाटणीसाठी सर्वसामान्य नागरिकांना आता ऑनलाइन वृक्ष कापणी परवानगी मिळणार आहे. त्यासाठीची स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, प्रजासत्ताक दिनापासून ही सुविधा पुणेकरांना मिळणार आहे.

यात वृक्ष प्राधिकरण विभागांतर्गत, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटणे, धोकादायक झाडे तोडणे व वृक्ष पुनर्रोपण अशा एकूण पाच सेवांचा लाभ घेता येणार आहे. या ऑनलाइन सेवा सुविधाचे शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, गुगल पे, नेटबॅंकिंग असे विविध पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. यासह पुणेकरांना ई-टिकटिंग संगणक प्रणाली, ऑनलाइन वारसाप्रकरणी संगणक प्रणाली, ऑनलाइन कॉन्सुलर मास्टर सिस्टीम आणि सायकल विभागाचे संकेतस्थळ अशी या चार संकेतस्थळाची सुविधाही उपलब्ध अरून दिली जाणार आहे. आतापर्यंत महापालिकेकडून 23 सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यात चार सुविधांची भर पडणार आहे.

नगरसेवकांची माहिती एका क्‍लिकवर
पालिकेकडून “ऑनलाइन कॉन्सुलर मास्टर सिस्टीम’ नावाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये 1952 पासून आजपर्यंत निवडून आलेल्या नगरसेवक/सभासदांची संकलित केलेली वैयक्तिक व राजकीय कारकिर्दीतील सविस्तर माहिती संग्रहित रूपात जतन केले जाणार आहे. यामध्ये त्यांनी विविध पदांवर असताना केलेली विकासकामे, घेतलेले महत्त्वाचे निर्णय, त्यांना मिळालेले पुरस्कार ही माहिती समाविष्ट असेल. भविष्यात नियुक्त होणाऱ्या सभासद, नगरसेवकाची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

पुणे हे डिजिटल साक्षरतेतही देशातील अग्रगण्य शहरांपैकी एक आहे. संपूर्ण महानगरपालिकेच्या कामकाजातील ऑनलाइन कार्यप्रणालीचा वापर आणखी वाढवून, पारदर्शकता व गतिशीलता वाढवण्याचा आमचा हेतू असून, याच अनुषंगाने प्रजासत्ताक दिनी एकूण चार ऑनलाइन संगणक प्रणाली पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचा उपयोग फायद्याचा ठरेल.
– मुरलीधर मोहोळ, महापौर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.